बैलगाडा शौकिनांना ‘आनंद’ देणारा ‘गंध’ हरपला…
कसाबाच्या दावणीवरून परत येऊन महाराष्ट्र चॅम्पियन बनलेला बोरगाव ता. जि. सातारा येथील गंध ग्रुपच्या ‘गंध’ या बैलाचा उद्या होणार तिसरा (सावडणे ) विधी
भुईंज ( महेंद्रआबा जाधवराव )महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीची अनेक मैदाने मारणारा महाराष्ट्र चॅम्पियन बोरगाव ता. जि. सातारा येथील गंध ग्रुपच्या “गंध ” या बैलाचे बुधवार दि. ९ ऑक्टोबर रोजी आजाराने निधन झाले. त्याच्यावर बोरगाव येथे काल विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.
शुक्रवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता सावडणे विधी होणार आहे. त्यानंतर प्रतिमापूजन, भजन व महाराष्ट्र भरातून आलेल्या बैलगाडा शौकिनांसाठी जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती गंध ग्रुप बोरगाव चे आणि अजिंक्यतारा साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष कर्मचारी अमोल भोसले यांनी दिली.
जनावरांच्या बाजारात कसबाच्या दावणीला चाललेलं सहा महिन्याचं वासरु पाहून बोरगावच्या पांडुरंग साळुंखे यांना त्याची दया आली. कसाबाला पैसे देऊन त्याला घरी आणलं. पोटाला भकाळी पडलेल्या त्या वासराला पप्पूशेठ बोरगावकर व अमोल भोसले यांच्या देखभाली खाली गोंडस बनवलं. सहा महिन्यातच वारूगत उधळलेल्या वासराचा गंध सर्वदूर पसरल्याने त्याच नाव ‘गंध’ आणि सांभाळ करणारे बैलगाडा शर्यतीवान ‘गंध ग्रुप बोरगाव ‘ म्हणून नावारूपाला आले.
बैलगाडा शर्यतीना बंदी असतानाच्या काळात बिनजोड गंध ने शर्यतीची तीस ते पस्तीस मैदाने
सलग मारून तो महाराष्ट्र चॅम्पियन ठरला होता. महाराष्ट्रभरातील अनेक मैदाने जिंकणाऱ्या गंधच्या निधनाने बोरगाव परिसर तसेच महाराष्ट्र भरातील बैलगाडा शौकिनांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.