Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » बाबासाहेबांच्या विचारांचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे सतीश कुलकर्णी : उत्तम कांबळे

बाबासाहेबांच्या विचारांचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे सतीश कुलकर्णी : उत्तम कांबळे

बाबासाहेबांच्या विचारांचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे सतीश कुलकर्णी : उत्तम कांबळे

 _पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार प्रदान

वाई – “भीममय आयुष्य जगणाऱ्या वाईच्या सतीश कुलकर्णी यांनी बाबासाहेबांच्या जगाशी स्वतःला जोडलं. बाबासाहेब यांच्यावरील साहित्याचा प्रचंड संग्रह त्यांनी केला असला तरी अख्खं साहित्य आणि ग्रंथालय त्यांच्या डोक्यातही आहे. बाबासाहेबांच्या विचारांचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे सतीश कुलकर्णी.”असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार व विचारवंत उत्तम कांबळे यांनी काढले. 

भोर येथील फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळाच्या वतीने दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार वाई येथील सतीश कुलकर्णी यांना नुकताच प्रदान करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात पुरस्कार सोहळा संपन्न झाला. रोख रक्कम रुपये दहा हजार, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच नवी दिल्लीस्थित विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांना राष्ट्रीय कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रोख रक्कम रुपये पंचवीस हजार, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. 

कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, माजी ऊर्जा मंत्री आमदार नितीन राऊत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष डॉ. सुनील धिवार, फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे उपाध्याक्ष सागर कांबळे, योगेश कांबळे, संतोष मदने, सतीश वाघमारे व्यासपीठावर उपस्थित होते. 

सत्काराला उत्तर देताना सतीश कुलकर्णी म्हणाले, “बाबासाहेब हे आमचे गुरुकुल आहे. या गुरुकुलाचा मी एक स्नातक आहे. मला मिळालेला हा सन्मान बाबासाहेबांच्या प्रेरणेचा सन्मान आहे. माझे आयुष्य भीममय आहेच पण ते अधिक भीममय करण्यासाठी ज्या असंख्य चाहत्यांनी, मित्रांनी, संस्थांनी, मंडळांनी मला उत्तेजन दिले त्यात भोरच्या ‘फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळा’चे स्थान अग्रस्थानी आहे. आंबेडकरी समाज हा प्रेमळ समाज आहे. या आंबेडकरी समाजाने मला हरवलेले, न सापडलेले, माहीत नसलेले असे अनेक नातेवाईक दिले. भारताचं किंबहुना जगाचं कल्याण करणारं सारभूत तत्वज्ञान म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. नवं जग निर्माण करणारे, नवे विश्व निर्माण करणारे कोण असतील तर ते बाबासाहेब. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान सतत डोळ्यापुढे ठेवले तर समाज पुढे जाईल आणि लोकशाही बळकट होईल.”

 डॉ. सुखदेव थोरात यांनी आपल्या भाषणात संपूर्ण भारतात आणि मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात झालेल्या जातिअंताच्या लढ्याचा सूक्ष्म इतिहास मांडला. प्रबुद्ध भारतासाठी बाबासाहेबांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या वचनाचा पुन्हा नव्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. 

फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रोहिदास जाधव यांनी प्रास्ताविक केले. सागर कांबळे आणि योगेश कांबळे यांनी मानपत्र वाचन केले. कार्यक्रमाला आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी, विद्यापीठाचे प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 74 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket