आग्र्यातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या उभारणीची जबाबदारी पर्यटन विभागाकडे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंती दिनी आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. या स्मारकासाठी कार्यवाही आणि निधीची जबाबदारी पर्यटन विभागाकडे देण्यात आली असून, यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित झाला आहे.
आग्रा येथील ज्या ऐतिहासिक वास्तूत छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते, ती वास्तू महाराष्ट्र शासन अधिग्रहीत करणार असून, त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त स्मारक उभारले जाणार आहे. संग्रहालय, दृकश्राव्य कार्यक्रम, माहितीपट आदी उपक्रमांच्या माध्यमातून महाराजांचा जाज्वल्य इतिहास पुढील पिढ्यांसाठी साकारला जाणार आहे. पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली इतिहासतज्ज्ञ आणि जाणकारांची समिती स्थापन होणार असून, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे. या ऐतिहासिक स्मारकामुळे देश-विदेशातील पर्यटकांना महाराजांच्या अद्वितीय पराक्रमाची गौरवगाथा अनुभवता येणार आहे.
