Home » ठळक बातम्या » एक्सीडेंट » अहमदाबादमध्ये प्रवासी विमान कोसळलं

अहमदाबादमध्ये प्रवासी विमान कोसळलं 

अहमदाबादमध्ये प्रवासी विमान कोसळलं 

अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळापासून जवळच एक विमान कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. गुजरातच्या मेघानीनगर परिसरात विमान कोसळलं आहे.हे एअर इंडियाचं प्रवासी विमान असल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या विमानातून २४२ प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती देणारी पोस्ट एएनआय वृत्तसंस्थेनं दिली आहे. शिवाय हे विमान निवासी भागात कोसळलं असल्यामुळे स्थानिक इमारतींचंही मोठं नुकसान झालं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, एकीकडे या अपघातात किती जीवित वा वित्तहानी झाली असावी याचा अंदाज यंत्रणांकडून घेतला जात असताना दुसरीकडे या अपघाताचे थरारक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. विमान कोसळल्यानंतर आगीचे भीषण लोळ हवेत पसरल्याचं काही दृश्यांमध्ये दिसून येत आहे.

हे एअर इंडियाचं ७८७ ड्रीमलायनर विमान होतं, अशी प्राथमिक माहिती हाती आली असून अद्याप अपघात नेमका का झाला? याचं कारण समजू शकलेलं नाही. यासंदर्भात विमानातील ब्लॅक बॉक्स हाती लागल्यानंतर त्याविषयी अधिकृत माहिती मिळू शकेल असं सांगितलं जात आहे.

काही दृश्यांमध्ये स्थानिक बचाव कार्याची दृश्य दिसत असून त्यात विमानाचे जळून कोळसा झालेले अवशेष दिसून येत आहेत. ज्या भागात हे विमान कोसळलं तिथे एक रुग्णालय, एक हॉस्टेल होतं असंही सांगितलं जात आहे. घटनास्थळी बचावकार्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या मोठ्या संख्येनं दाखल झाल्या असून एसडीआरएफची तीन पथकंही दाखल झाली आहेत.

दरम्यान, अपघातग्रस्त झालेलं विमान हे आंतरराष्ट्रीय प्रवासाचं विमान असल्याचं सांगितलं जात आहे. अहमदाबादहून लंडनच्या दिशेनं या विमानानं टेकऑफ केलं होतं. मात्र, टेकऑफ केल्यानंतर अवघ्या काही वेळातच विमान अपघातग्रस्त झालं.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

Post Views: 248 महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त महाबळेश्वर: महाबळेश्वर येथील हॉटेल ऑक्सिजनमध्ये २५

Live Cricket