राधिका रोडची दुरवस्था; वाहनचालकांना ‘मंगळावर’ असल्याचा अनुभव सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले लक्ष देणार का?
सातारा प्रतिनिधी : सातारा शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा समजला जाणारा राधिका रोड सध्या खड्ड्यांनी अक्षरशः विदीर्ण झाला आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना जणू काही मंगळ ग्रहावरील खडबडीत पृष्ठभागावरून प्रवास करत असल्याचा अनुभव येत आहे.
रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि पावसामुळे साचणारे पाणी यामुळे दुचाकी, चारचाकी तसेच पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दररोज हजारो नागरिक या मार्गाचा वापर करतात. मात्र रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करूनही अद्याप ठोस दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित प्रवास मिळावा यासाठी राधिका रोडची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन राधिका रोडच्या दुरुस्तीचे आदेश द्यावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.





