स्मार्ट मीटरविरोधात कराडात जनआक्रोश मोर्चा वीज वितरण व तहसील कार्यालयावर धडक; अन्यथा रास्तारोकोचा इशारा
कराड ( ज्ञानेश्वर शेवाळे)स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेत ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचा आरोप करत विविध सामाजिक, शेतकरी आणि राजकीय संघटनांनी सोमवारी कराडमध्ये जनआक्रोश मोर्चा काढत वीज वितरण कार्यालय आणि तहसील कार्यालयावर धडक दिली. स्मार्ट मीटरची सक्ती तातडीने थांबवावी, आधी बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून पारंपरिक मीटर पुन्हा बसवावेत, तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित करण्याची पद्धत बंद करावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
शहरातील शिवतीर्थ दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरातून मोर्चास प्रारंभ झाला. वीज वितरण कार्यालयासमोर मोठ्या संख्येने शेतकरी व विविध संघटनांचे कार्यकर्ते एकत्र आले होते. भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे, पंचायत समिती सदस्य संग्राम पवार व रवी बडेकर, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल बापू घराळ, राष्ट्रवादी युवा कराड तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, जान फाउंडेशनचे जावेद नायकवडी यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.
मोर्चादरम्यान आंदोलकांनी वीज वितरण प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत स्मार्ट मीटर धोरणाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मोर्चे करी पायी चालत प्रशासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी बोलताना पं.स. सदस्य संग्राम पवार यांनी, सातारा जिल्ह्यातील अनेक भागांतील शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले. शेतीपंपांची वीज तातडीने सुरू करावी, तसेच ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा याचे गंभीर परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
भीमशक्तीचे आनंदराव लादे यांनी, बाहेरच्या राज्यांमध्ये २०० युनिट फ्री आहे, तसे महाराष्ट्रात का होत नाही? त्याचाही ठराव महाराष्ट्र शासनाने करावा, अशी मागणी केली. तसेच स्मार्ट मीटर सक्तीचे धोरण सर्वसामान्य ग्राहकांवर आर्थिक भार टाकणारे असून, ग्राहकांच्या संमतीशिवाय जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला.
राष्ट्रवादीचे प्रशांत यादव यांनी, येणाऱ्या पावसाळी आदेशनात सक्तीने स्मार्ट मीटर न बसवण्याबाबतचा ठराव घेण्यात यावा, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
निवेदन स्वीकारल्यानंतर कार्यालयाबाहेर प्रशासकीय पुन्हा एकदा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. स्मार्ट मीटरविरोधातील जनतेचा वाढता रोष लक्षात घेऊन शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा कोल्हापूर नाका येथे शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात लवकरच रास्तारोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विविध सामाजिक, शेतकरी आणि राजकीय संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी दिला. यावेळी कादरभाई नायकवडी, सुवर्णाताई विठुळे, शामराव मोहिते, दत्तात्रय दुपटे, संजय कांबळे, भीमशक्ती वाहतूक सेनेचे फिरोज सावकार आदी उपस्थित होते.




