मान्सून गोव्यात दाखल; पुढील २ ते ३ दिवसात मान्सून कोकणात दाखल होणार
मुंबई- शेतकऱ्यांसह सर्वांकडून आतुरतेने वाट पाहिली जात असलेला मान्सून आज गोव्यामध्ये दाखल झाला आहे. पुढील २ ते ३ दिवसांत महाराष्ट्रात दाखल होण्यास अनुकूल वातावरण असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
तसेच गोव्यानंतर आता पुढच्या काही दिवसांतच मान्सून सीमा ओलांडून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन तीन दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच ९ जून दरम्यान कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे हवमान खात्याने म्हटले आहे. दरम्यान,समुद्र प्रचंड खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने १० जून २०२६ या काळात दक्षिण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळचा किनारी भाग, तसेच लक्षद्वीप आणि पूर्व-मध्य अरबी समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा मच्छिमारांना देण्यात आला आहे.
काल केरळमध्ये धडकलेला मान्सून आज गोव्यात दाखल झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २ ते ३ दिवसांत मान्सून तळकोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, यंदा मान्सूनचे केरळ आणि महाराष्ट्रातील आगमन लांबल्याने बळीराजासह सर्वसामान्यांना पावसाची आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. हवामान खात्याने यंदा २६ मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, प्रत्यक्षात मान्सून केरळमध्ये पोहोचण्यासाठी ४ जून उजाडावी लागली. केरळमधील या विलंबाचा परिणाम महाराष्ट्रातील आगमनावरही झाला आहे. आता राज्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी अजूनही ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागणार आहे.




