जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तहसील कार्यालयास निवेदन
वाई : सामान्य जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यासाठी शशिकांत शिंदे यांच्या तसेच जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार वाई तालुक्याच्या वतीने आज वाई येथील तहसीलदार सौ. सोनाली मेटकरी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनामध्ये वाढती महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा, स्मार्ट मीटरची सक्ती, कांदा निर्यातबंदी, नीट परीक्षा पेपर फुटी, शेतकरी कर्जमाफी आदी महत्त्वाच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले. गेल्या १२ वर्षांत केंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून सामान्य नागरिक महागाईमुळे होरपळून निघत असल्याचा आरोप यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. सरकारने तातडीने या प्रश्नांवर तोडगा काढून जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी अॅड. निलेश डेरे, डॉ. सतीश बाबर, तेजपाल वाघ, संतोष पवार, मोनिका चव्हाण, संग्राम कदम, सुरेश देशमाने, दत्तात्रय पवार, श्रीनाथ रेणुसे, सचिन साळुंखे, श्रीनाथ सूर्यवंशी, मुजरफ मोमीन यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




