पाचगणी टोल नाक्यावर महाबळेश्वरला येणार्या पर्यटकांची लूट थांबली; अवाजवी टोल वसुली बंद
महाबळेश्वर:पाचगणी येथील टोल नाक्यावर महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांकडून केली जाणारी अवाजवी टोल वसुली अखेर बंद करण्यात आली आहे. मा. नामदार मकरंद पाटील यांच्या पुढाकाराने आणि उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर टोल व्यवस्थापनाला सक्त ताकीद देण्यात आली असून, आता महाबळेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांना या टोलमधून मुक्त करण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करत टोल नाक्यावर तसे स्पष्ट फलकही लावण्यात आले आहेत. पर्यटकांची होत होती मोठी अडवणूक गेल्या काही महिन्यांपासून महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांकडून पाचगणी टोल नाक्यावर सक्तीने टोल आकारला जात होता. जे पर्यटक पाचगणीत न थांबता थेट महाबळेश्वरला जात होते, त्यांच्याकडूनही टोल वसूल केला जात असल्याने दररोज पर्यटक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत होते. यामुळे पर्यटकांमध्ये नाराजीचे वातावरण होते आणि सोशल मीडियावरून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. स्थानिकांच्या मते, प्रशासन आणि टोल व्यवस्थापन यांच्यातील संगनमतामुळे हा प्रकार सुरू होता, ज्याचा थेट फटका महाबळेश्वरच्या पर्यटन प्रतिमेला बसत होता.
लोकप्रतिनिधींच्या बैठकीत निर्णय
पर्यटकांची होणारी लूट आणि महाबळेश्वरची बदनामी थांबवण्यासाठी स्थानिक व्यावसायिक आणि नागरिकांनी आवाज उठवला होता. या पार्श्वभूमीवर, मा. नामदार मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासन, टोल व्यवस्थापन आणि लोकप्रतिनिधींची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत पर्यटकांच्या हिताचा निर्णय घेत, महाबळेश्वरला जाणाऱ्या वाहनांकडून टोल न घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
व्यावसायिक आणि पर्यटकांकडून समाधान
या निर्णयामुळे महाबळेश्वरला भेट देणाऱ्या हजारो पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानिक हॉटेल व्यावसायिक, व्यापारी आणि पर्यटन क्षेत्रातील घटकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, यामुळे महाबळेश्वरच्या पर्यटनाला पुन्हा एकदा चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या बैठकीस ना. मकरंद पाटील यांच्यासह महाबळेश्वरचे नगराध्यक्ष, सुनील शिंदे, नगरसेवक ॲड. संजय जंगम, पाचगणीचे नगरसेवक आणि टोल व्यवस्थापनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.




