8 खासदार असणाऱ्या शरद पवारांचे 10 आमदार अन् 1 खासदार असणाऱ्या अजितदादांचे 42 आमदार; राज ठाकरेंनी मांडलं गणित
राज्यातील विधानसभा निवडणुकीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शंका उपस्थित करत दुभागलेल्या राष्ट्रवादीचं गणित मांडलं आहे. 8 खासदार असणाऱ्या शरद पवारांचे 10 आमदार अन् 1 खासदार असणाऱ्या अजितदादांचे 42 आमदार कसं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
मनसेच्या मुंबईतील मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. विधान सभा निवडणुकीत, भाजपला 132 जागा मिळाल्या, गेल्यावेळी 105 जागा होत्या. 2014 ला 122 जागा त्यांनी जिंकल्या होत्या. पण अजित पवार 42 जागा, चार-पाच जागा येतील की नाही, असं वाटत असताना त्यांना 42 जागा मिळाल्या. जे इतके वर्षे महाराष्ट्रात राजकारण करत आले त्यांना 10 जागा मिळतात, ही न समजण्यापलीकडची गोष्ट असल्याचे ठाकरे म्हणाले. तसेच, लोकसभेला काँग्रेसचे सर्वाधिक 13 खासदार निवडून आले. एका खासदाराच्या खाली सहा आमदार येतात निवडून. त्यांचे 15 आमदार निवडून आले. शरद पवारांचे 8 खासदार निवडून आले होते, त्यांचे 10 आमदार येतात. लोकसभेला ज्या अजित पवार यांचा एक खासदार निवडून येतात त्यांचे 42 आमदार चार महिन्यात निवडून आले. काय झालं, कसं झालं, हा संशोधनाचा विषय आहे. या मतदानावर जाऊ नका, लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे, ते फक्त आपल्यापर्यंत आलेलं नाही, केलेलं मतदान कुठेतरी गायब झाले. असे राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
यासोबतच, निकालानंतर महाराष्ट्रात इतका सन्नाटा कधीच नव्हता अशी प्रतिक्रियाही ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली. ‘निवडणुकीचा निकाल लागल्यावरती ज्या दिवशी निकाल लागला, त्या दिवशी मी महाराष्ट्रात पहिल्यांदा पाहिलं महाराष्ट्रात सन्नाटा पसरला होता. ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला हवा होता ज्या प्रकारचा मिरवणुका जल्लोष पाहिजे होता त्या जागी फक्त राज्यभरात सन्नाटा पसरला होता.
हे काय झालं कसं झालं असा कसा निर्णय आला, माझ्याकडे एक व्यक्ती आली होती. ती व्यक्ती संघाशी संबंधित होती. त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं त्यांना हे पटलेलं नाही.त्यांनी फार छान वाक्य माझ्यासमोर बोलले मला म्हणाले इतना सन्नाटा क्यू है भाई. कोई तो जीता होगा कोणीतरी जिंकला असेल ज्याच्यातून जल्लोष होईल. पण महाराष्ट्रामध्ये जो सन्नाटा पसरला हे कसलं द्योतक आहे. काही काही गोष्टींवरती विश्वासच बसू शकत नाही, असा राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
