76 वा प्रजासत्ताक दिन वाई शहरात मोठ्या उत्साहात साजरा
वाई दि २६ :-दरवर्षी प्रमाणे यावर्षीही वाई शहरात 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. वाई शहराला आरोग्य पाणीपुरवठा, दिवाबत्ती यांसारख्या विविध सेवा देण्यासाठी अविरत झटणाऱ्या वाई नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांचा सन्मान म्हणून कर्मचाऱ्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्याची परंपरा कायम राखत नगर परिषदेचे जेष्ठ कर्मचारी बागमजुर श्री कुंडलिक लाखे, यांच्या हस्ते नगरपरिषदेचे झेंडावंदन पार पडले. वाईतील स्वातंत्र्यसैनिक श्री सदाशिव मोरेश्वर सुरत्राण यांचे वारस श्री. अरविंद वासुदेव बोपर्डीकर यांच्या हस्ते हुतात्मा स्मारक येथील झेंडावंदन पार पडले.
वाई शहरातील मध्यवर्ती असलेल्या भाजी मंडईतील झेंडावंदन वाई नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी श्रीमती संजीवनी दळवी यांच्या हस्ते पार पडले. या झेंडावंदन कार्यक्रमावेळी राष्ट्रगीत, राज्यगीत तसेच ध्वजगीताचे गायन करण्यात आले.सदर कार्यक्रमांसाठी शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार व नागरिक उपस्थित होते.तसेच शहरात ठीक ठिकाणी विविध संस्थांच्या माध्यमातून झेंडावंदन पार पडले.
वाई प्रशासकीय कार्यालयात शासनाचे वतीने प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांचे हस्ते व तहसीलदार सोनाली मिटकरी ,उपअधिक्षक साठे साहेब, तालुका कृषी अधिकारी शेंडे,आदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी स्वातंत्र्यसैनिक व मान्यवर नागरीकांचा सत्कार करण्यात आला.सार्वजनिक बांधकाम उप विभागाचे ध्वजारोहण उपविभागीय अधिकारी महेश गोंजारी यांचे हस्ते करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वाई नगर परिषदेमार्फत नगरपरिषद कार्यालय, शहरातील मुख्य रस्त्यावर तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. स्वच्छ सर्वेक्षण व माजी वसुंधरा अभियानांतर्गत नगरपरिषदेमार्फत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.तसेच वाई कोर्ट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय, प्रशासकीय कार्यालय आदी शासकीय इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. वाई शहरात सर्वत्र जिलेबीचे स्टाॅल उभारण्यात आले होते .
