सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने 31 ऑक्टोबर हा दिवशी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने
सरदार वल्लभभाई पटेल
(दि.३१ ऑक्टोबर, १८७५ ते दि. १५ डिसेंबर, १९५०)
अल्प परिचय
भारतीय स्वातंत्र्य-आंदोलनातील एक ज्येष्ठ नेते व स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान त्यांचा जन्म दि. ३१ ऑक्टोबर, १८७५ रोजी गुजरातमधील लेवा पाटीदार शेतकरी कुटुंबात करमसद (खेडा जिल्हा) येथे झाला. महात्मा गांधींच्या असहकारितेच्या चळवळीत वल्लभभाई आघाडीवर होते. सन १९२८ च्या फेब्रुवारीत बार्डोलीला करबंदीची चळवळ जोरात सुरू झाली. त्या लढ्याची संपूर्ण योजना वल्लभभाईंची होती. फेब्रुवारी, १९२८ ते ऑक्टोबर, १९२८ पर्यंत हा लढा चालू होता. त्यात त्यांनी घवघवीत यश मिळविले. त्यांचे नाव सर्व भारतभर दुमदुमू लागले व याच वेळी सरदार ही उपाधी त्यांना प्राप्त झाली.
महत्त्वाचे व राष्ट्रीय ऐक्याचे काम म्हणजे संस्थानांच्या विलीनीकरणाचे काम होय. त्यांनी हैद्राबाद, जुनागढ व काश्मीर सोडून इतर सुमारे ५५० संस्थाने भारतात विलीन केली. पुढे त्यांनी हैद्राबाद संस्थानही, पोलीस कारवाई करून खालसा केले. प्रसिद्ध सोरटी सोमनाथ मंदिराच्या पुनरुज्जीवनासाठी व व्यवस्थेसाठी त्यांनी एक विश्वस्त निधी उभा केला. अस्पृश्यांना त्या देवळात प्रवेश व पूजा करण्याचा हक्क विश्वस्त पत्रकात वल्लभभाईंनी नमूद केला, तसेच सर्व धर्माच्या व्यक्तींना खुल्या प्रवेशाची तरतूदही त्यात नमूद केली. दि.१५ डिसेंबर, १९५० रोजी त्यांचे निधन झाले.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आणि त्यानंतरच्या स्वातंत्र्योत्तर भारतात वल्लभभाईंना मानाचे स्थान आहे. एकात्म भारताचे ते खरे शिल्पकार असून भारताचा पोलादी पुरुष म्हणून त्यांची जगभर ख्याती होती. साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि तात्काळ कृती यांवर त्यांचा भर असे.




