Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » २५ ऑक्टोबर स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले (दादाजी) यांचा स्मृतिदिन.

२५ ऑक्टोबर स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले (दादाजी) यांचा स्मृतिदिन.

२५ ऑक्टोबर स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले (दादाजी) यांचा स्मृतिदिन.

दादाजींच्या विचारांनी लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवले.त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण “मानवातला देव जागविण्याचा” संदेश देणारा होता.लेखक राजेंद्र खेर यांनी त्यांच्या प्रेरणादायी कार्यावर आधारित हृदयस्पर्शी लेखातून दादाजींच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा उलगडला आहे.

गंगासागर-स्वरूप दैवी परिवार! – राजेन्द्र खेर 

समाजामध्ये मूळ सनातन संस्कृतीतला ज्ञानविचार जावा यासाठी १६ ऑक्टोबर १९२६ या दिवशी विजयादशमीच्या सुमुहूर्तावर पू. वैजनाथशास्त्री आठवले यांनी मुंबईत ‘श्रीमद्भगवद्गीता पाठशाळे’ची प्रस्थापना केली. या वर्षी म्हणजे १६ ऑक्टोबर २०२५ मध्ये ही पाठशाळा शतकमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. त्यांचे सुपुत्र पूजनीय पांडुरंगशास्त्री (दादा) यांनी पुढे याच पाठशाळेतल्या व्यासपीठावरून जवळपास साठ वर्षे अव्याहत प्रवचन करून लोकांना कार्यप्रवण केले. वयाच्या केवळ बाविसाव्या वर्षी त्यांनी ‘मांडुक्य उपनिषदा’वर प्रवचन करण्यापासून आपल्या कार्याला प्रारंभ केला होता. पाठशाळेचे शतकमहोत्सवी वर्षात पदार्पण आणि १९ ऑक्टोबर हा पांडुरंगशास्त्रींचा जन्मदिवस असा माणिकांचन योग या वर्षी जुळून आला आहे. ‘श्रीमद्भगवद्गीता पाठशाळा’ ही पांडुरंगशास्त्रींच्या विशाल स्वाध्याय कार्याची गंगोत्री ठरली. पद-पैसा-प्रतिष्ठा, अधिकार, जात, धर्म, पंथ, राष्ट्रीयता यांपलीकडचा विचार करून प्रत्येक मनुष्य हा भगवंताचाच आहे; किंबहुना भगवंत हृदयात आहे म्हणूनच मनुष्याचा गौरव आहे, या पांडुरंगशास्त्रींच्या सर्वसमावेशक विचारातून त्यांचाच जन्मदिवस हा ‘मनुष्य गौरव दिन’ म्हणून स्वाध्याय परिवारातर्फे साजरा केला जातो.   

पाठशाळेतून मनुष्याच्या सर्वांगीण उन्नतीसाठी विचार देत असतानाच १९५६ साली पांडुरंगशास्त्रींनी ठाण्यामध्ये ‘तत्त्वज्ञान विद्यापीठा’ची मुहूर्तमेढ रोवली. हे विद्यापीठ भारतीय आणि पाश्चात्त्य तात्त्विक अभ्यासाचे माहेरघर ठरले. गुरुकुल शिक्षण व्यवस्थेनुसार तिथून विद्यार्थी ‘आर्यवृत्त’ ही पदवी संपादन करू लागले. दरम्यान नियमित स्वाध्याय करणाऱ्यांसाठी ‘जिज्ञासू’ ते ‘पारंगत’ अशी पदविका मिळवण्याचीही व्यवस्था पांडुरंगशास्त्रींनी केली. सुमारे साठ वर्षांच्या अथक तापातून पांडुरंगशास्त्रींचा विशाल स्वाध्याय परिवार निर्माण झाला. या परिवाराचे विशेषत्व म्हणजे ‘स्व’अध्याय करून कोणीही मनुष्य स्वतःचा विकास करू शकतो. त्यासाठी दुसऱ्या कुणावर अवलंबून राहावे लागत नाही! स्वाध्याय करणाऱ्या व्यक्तीमध्ये दैवी भाव जागृत होतो. गीता-विचारानुसार, बुद्धिनिष्ठ भाव आणि श्रद्धा म्हणजेच अनन्य भक्ती असते. बुद्धिनिष्ठ भाव आणि श्रद्धा ठेवून मनुष्याचे आध्यात्मिक परिवर्तन होऊ शकते किंवा त्याची आत्मोन्नती होऊ शकते, हे पांडुरंगशास्त्रींनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिले. म्हणूनच आत्तापर्यंत जगात ज्या क्रांत्या झाल्या त्याला पांडुरंगशास्त्रींनी ‘भावनिक’ आणि ‘आध्यात्मिक’ क्रांतीची जोड दिली असे म्हटले जाते. ‘डोकी उडवून कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत तर डोकी बदलून प्रश्न मिटतील’ असा त्यांचा विचार होता. म्हणूनच ‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही विचारधारा मनुष्याला तारू शकेल, त्याचे जीवन दैवी बनवू शकेल, असा त्यांचा विश्वास होता आणि तो त्यांनी आपल्या कार्यातून यथार्थ करून दाखवला. या त्यांच्या कार्यामागे ईशप्रेरणा होती. प्रत्येक मनुष्याप्रती प्रचंड व्यथा होती. शेवटचा माणूस कसा जगतो, त्याच्याकडे कोणीही जात नाही, प्रेमाने त्याच्या पाठीवर हात फिरवत नाही, संस्कृतीचे विचार त्याला कोणी सांगत नाही, त्याला उन्नतीचा मार्ग दाखवत नाही, ‘परमात्मा माझ्याबरोबर आहे; मग मी हीन कसा असेन,’ या वास्तवाची जाणीव त्याला कोणी करून देत नाही, अशा विचारांनी ते हताश होत. कुलाब्याजवळच्या सागरतीरी बसून त्यांचे विचारमंथन चाले. रॉयल एशियाटिक ग्रंथालयातील शेकडो पुस्तके वाचून ते मार्ग शोधीत असत. पण मार्ग सापडत नव्हता. परंतु, एके दिवशी त्यांना मार्ग सापडला. एक नावाडी दूर समुद्रात विशालकाय लाटांशी झगडत आपली नाव सुखरूप किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करीत असलेला त्यांना दिसला. संकटाना समर्थपणे तोंड देणारे कोळी बांधवांसारखे लोक हे संस्कृतीचे ऋषीय कार्य तितक्याच समर्थपणे करतील या विचाराने ते कार्यप्रवण झाले. मग पांडुरंगशास्त्री स्वतः वाड्या-वस्तीवर जाऊ लागले. शेतकरी, आगरी, वाघरी, नागरी, शहरी, कातकरी, वनवासी, आदिवासी अशा लोकांमध्ये जाऊन ते बसू लागले. कच्छपर्यंत संपूर्ण पश्चिम किनारपट्टी त्यांनी पिंजून काढली. पुढे संपूर्ण भारत त्यांनी पालथा घातला. व्यासपीठावरून त्यांनी जे सांगितले ते त्यांनी आधी स्वतः केले. तीच त्यांची अविरत केलेली ‘भावफेरी’ होती; ‘भक्तिफेरी’ होती – तेच ऋषिप्रणित ‘तप’ होते. 

अशा अखंड-अविरत भ्रमंतीतून ‘स्वाध्याय’ची संकल्पना पुढे आली आणि यथावकाश स्वाध्यायींमध्ये ती रुजली. ईश्वरी कार्यासाठी उचललेले दुःख म्हणजे ‘तप’ असते. पांडुरंगशास्त्रींच्या प्रेरणेने एकादशी, तीर्थयात्रा, भावफेरी, भक्तिफेरी अशा माध्यमातून लाखो स्वाध्यायी नियमित ‘तप’ करू लागले. त्यांच्या सुकन्या धनश्रीदीदी तळवलकर यांनी हेच कार्य समर्थपणे पुढे नेताना कालानुरूप त्यात थोडे बदल केले. त्यांनी ‘व्रती’चा प्रयोग स्वाध्यायींना दिला. 

‘मारून खाऊ नकोस, चोरून खाऊ नकोस; पेरून खा’ ‘आत्मगौरव-परसन्मान आणि ईशपूजन करून आपला विकास साधावा’ असे शेकडो विचार पांडुरंगशास्त्रींनी आणि तपोनिष्ठ स्वाध्यायींनी शेवटच्या मनुष्यापर्यंत पोचवले. त्याचप्रमाणे, ‘भक्ती ही सामाजिक शक्ती आहे’ ‘भक्ती ही समज आहे’ ‘भगवान दूसरा नहीं, वह दूर नहीं, और उसे मिलने में देर नहीं’ ‘आपली निपुणता निरपेक्ष भावाने सत्कार्यात वापरली तर ती सुद्धा भक्ती होते’ असेही हजारो विचार पांडुरंगशास्त्रींनी ‘श्रीमद्भगवद्गीता पाठशाळे’च्या व्यासपीठावरून दिले. आसेतु हिमाचल स्वतः फिरून माणसामाणसांमध्ये ‘स्वाध्याय’च्या माध्यमातून रुजवले. शेवटच्या मनुष्याचीही अस्मिता जागृत केली. ‘स्वाध्याय’मधून ‘आत्मगौरव’ ‘परसन्मान’ आणि ‘ईशपूजन’ हा मंत्र दिला. जीवन उन्नत होण्यासाठी आणि जाणिवा प्रगल्भ होण्यासाठी ‘त्रिकाल संध्या’ दिली. ते म्हणत, ‘त्रिकाल संध्या’ हा ऍटमबॉम्ब आहे. एका ऍटमबॉम्बने मनुष्यमात्रांचा संहार केला तर ही ‘त्रिकाल संध्या’ मनुष्यमात्रांचा सर्वार्थाने विकास साधते. त्याला समर्थ बनवते; त्याचा जीवनविकास साधते. ‘त्रिकाल संध्ये’मुळे ‘कृतज्ञता भाव’ अंगिकारला जातो. पांडुरंगशास्त्री म्हणत, ‘जेव्हा मनुष्यामध्ये कृतज्ञता बुद्धी येते तेव्हा ‘धैर्य’ आपोआप येते. त्यामुळे मन कधी विचलित होत नाही. उलट मनाचे सामर्थ्य वाढत जाते. पांडुरंगशास्त्रींनी इतर अनेक प्रयोगांबरोबरच स्वाध्यायींना ‘सायंप्रार्थने’चा मंत्र दिला. ही कौटुंबिक प्रार्थना असते. रोज रात्री ८.३० वाजता सर्व कुटुंबीयांनी एकत्र येऊन ही प्रार्थना करायची असते. सर्व कुटुंबीयांनी एकत्र येऊन जेव्हा सायंप्रार्थना केली जाते तेव्हा त्याच्या दैवी परिणामांखेरीज त्याचे इतर काय सुपरिणाम होतात ते सांगण्याची आवश्यकता नाही! 

पांडुरंगशास्त्रींनी ‘भावफेरी’ आणि ‘भक्तीफेरी’ यांच्या द्वारे निष्काम कर्मयोगाचा वसा स्वाध्यायींना दिला. ‘निष्काम कर्मयोगा’ची महती भागवद्गीतेसह इतर अनेक विचारधारांनी अधोरेखित केली आहे. नियमित ‘स्वाध्याय’मधून पांडुरंगशास्त्रींनी ही विचारधारा लक्षावधी लोकांमध्ये रुजवली. आज लाखो स्वाध्यायी कोणत्याही अपेक्षेशिवाय व्रतस्थ होऊन ‘भावफेरी’ आणि ‘भक्तिफेरी’ आणि ‘व्रती’च्या माध्यमातून निष्काम कर्मयोग करीत असतात. हे ‘तप’ चैतन्याने चैतन्याला भेटून, दैवी भ्रातृभाव सांगून तसेच दैवी संबंध समजावून आणि परस्परांना पुष्टी देऊन केले जाते. या तपातून जे स्वीकृत दुःख उचलले जाते तो ‘सात्त्विक त्याग’ होतो; आणि असा त्याग स्वाध्यायीला असीम आनंद देतो. जे लोक या विचारधारेशी जोडले गेले ते, एक आचार, एक विचार आणि एक उपासनापद्धती अवलंबू लागले. यथावकाश परस्परांना पुष्टी देणारा हा गंगासागर-स्वरूप दैवी परिवार अस्तित्वात आला. पांडुरंगशास्त्रींच्या साठ वर्षांच्या अविरत कार्याची-तपाची ही परिणिती म्हटली पाहिजे. ‘स्वाध्याय’मुळे व्यक्ती सर्वार्थाने उन्नत होत जाते. कुटुंबात प्रेमभाव आणि त्यागवृत्ती जोपासली जाते. कर्मकांड विरहित नियमित ‘त्रिकाल संध्या’ केल्यामुळे अंतस्थ जाणिवा प्रगल्भ होत जातात. दैवी संवेदना जागृत होतात. ‘सायंप्रार्थने’मुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. कुटुंबा-कुटुंबांमध्ये निरपेक्ष भ्रातृभाव जोपासला जातो. पांडुरंगशास्त्री म्हणत- ‘Bhakti is an understanding!’ – भक्ती ही समज आहे. या भक्तीत मग मागणी राहात नाही. अशा भक्तीची समज आली तर जीवनात आनंदाची अनुभूती येऊ लागते. ‘त्रिकाल संध्ये’मुळे ‘कृतज्ञता भाव’ जागृत होतो, ‘कृतिभक्ती’मुळे ‘निष्काम कर्मयोग’ साध्य होतो. पांडुरंगशास्त्रींनीं दिलेल्या ‘शास्त्रीय मूर्तिपूजे’मुळे परामार्ग प्रकाशित होण्यासाठी मूर्तीची आवश्यकता उमजते. ‘शास्त्रीय मूर्तिपूजे’मुळे मन सामर्थ्यवान (powerful), संवेदनशील (sensitive), आणि प्रगमनशील (progressive) बनते. हा स्वाध्याय मंत्र समस्त मानवांसाठी सर्वार्थाने उन्नतीचा मार्ग दर्शवतो.         

पांडुरंगशास्त्रींच्या दैवी विचारधारेला आणि अफाट कार्याला गवसणी घालणे ही गाेष्ट साेपी खासच नाही. उपजत ज्ञानासह, वेदोपनिषद, दर्शनशास्त्रे, विविध भारतीय भाष्ये यांपासून देकार्त, व्हाईटहेड, ड्युरांड, हेगेल, कान्ट, मार्क्स, फ्रॉइड आदी असंख्य विचारवंतांच्या विचारांच्या तौलनिक अभ्यासातून पांडुरंगशास्त्रींनी हा स्वाध्याय-मंत्र लक्षावधी स्वाध्यायींमध्ये रुजवला. 

मानवसमूह हा परस्परावलंबी आहे. परस्परांना पुष्टी देऊनच प्रत्येक मनुष्याचे जीवन सुंदर होते; ते दैवी बनू लागते. त्यामागे जसे मानसशास्त्र आहे तसेच विज्ञानही आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हीच विचारधारा मनुष्याला तारेल आणि त्याचे जीवन दैवी बनवेल. ईश्वराभिमुख समाज निर्माण होण्यातूनच ईश्वर प्रसन्न होत असतो, हे पांडुरंगशास्त्रींनीं स्वानुभवातून समजावले. उपजत ज्ञानासह, वेदोपनिषदांपासून, तसेच जगातील अनेकविध तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातून पू. पांडुरंगशास्त्रींनी अत्यंत व्यथेतून आणि अफाट परिश्रमांतून हा स्वाध्यायमंत्र लक्षावधी स्वाध्यायींमध्ये रुजवला. पांडुरंगशास्त्रींनीं केवळ विचार दिले नाहीत तर व्यवस्था दिली! जे विचार दिले, जे विविध विचारधारांशी झालेल्या वादविवादांतून मांडले ते अनेकविध प्रयोगांमधून सिद्धही केले. म्हणूनच त्यांचे ‘योगेश्वर कृषी’ वृक्षमंदिर’ २० गावांचे ‘श्रीदर्शनम’ ‘हिरामंदिर’ ‘अमृतलयम्’ असे जवळपास चाळीस प्रयोग आजही कार्यरत आहेत. त्यासाठी त्यांना ‘टेम्पल्टन’ ‘मॅगसेसे’ ‘लो. टिळक पुरस्कार’ यांसह शंभरावर पुरस्कार दिले गेले. ‘श्रीमद्भगवद्गीता पाठशाळे’चे शताब्दी वर्षात पदार्पण आणि मनुष्यगौरव दिनानिमित्त पू. पांडुरंगशास्त्रींच्या स्मृतीला वंदन!

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

Post Views: 64 नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन सातारा-भारत

Live Cricket