यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये मायक्रो-प्रोजेक्ट स्पर्धा उत्साहात संपन्न
सातारा : यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, सातारा येथील यशोदा टेक्निकल कॅम्पस येथे संस्थेच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी पॉलिटेक्निक विभागाकडून आयोजित मायक्रो-प्रोजेक्ट स्पर्धा उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती, नावीन्यपूर्ण कल्पना, सर्जनशीलता आणि प्रात्यक्षिक कौशल्यांना प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.
या स्पर्धेत शालेय विद्यार्थी, डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध तांत्रिक व सामाजिक समस्यांवर आधारित प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), शेती, पर्यावरण संवर्धन, दिव्यांगांसाठी तंत्रज्ञान, जलव्यवस्थापन आणि औषधसुरक्षा यांसारख्या विषयांवरील तब्बल २०९ प्रकल्पांनी विशेष लक्ष वेधून घेतले.
डिप्लोमा गटात यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या प्रथमेश गोफणे व सुरज घाडगे यांच्या ‘AI Crop Recommendation System for Farmer and Yield Prediction’ या प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला. ओंकार जगताप व वेदांत यादव यांच्या ‘Sign Speak India’ या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भारतीय सांकेतिक भाषा अनुवादक प्रकल्पाने द्वितीय क्रमांक मिळविला.
शालेय गटात यशोदा पब्लिक स्कूलच्या अर्णव पवार व अक्षत चावरे यांच्या ‘Water Level Indicator’ या प्रकल्पाने प्रथम क्रमांक मिळविला. साधना माध्यमिक विद्यालयाच्या आराध्या पळखे व सई जाधव यांच्या ‘Carbon Purification for Factories and Industries’ या प्रकल्पाने द्वितीय क्रमांक पटकावला.
पदवी गटात यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या अभियांत्रिकी विभागातील अलोक कदम व साहिल भिलारे यांच्या ‘Label Lens AI’ या प्रकल्पाने प्रथम क्रमांक मिळविला. अदिती भोसले व श्रेयसी गुजर यांच्या ‘Braillify: An Intelligent Multilingual Text and Voice-to-Braille Conversion System’ या प्रकल्पाने द्वितीय क्रमांक मिळविला.
पदव्युत्तर पदवी गटात फार्मसी विभागातील सई गायकवाड यांच्या ‘Safe to Cut, Safe to Store’ या प्रकल्पाने प्रथम क्रमांक मिळविला. एमसीए विभागातील साक्षी लोखंडे व तनया पोतदार यांच्या ‘Question Paper Generation System’ या प्रकल्पाने द्वितीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपल्या कल्पनांचे प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये रूपांतर करण्याची, तांत्रिक ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग करण्याची आणि संशोधनाभिमुख दृष्टिकोन विकसित करण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम ठरला.
यावेळी संस्थेचे संस्थापक मा. प्रा. दशरथ सगरे सर यांनी सर्व विद्यार्ध्यांना मार्गदर्शन करत असताना सांगितले कि, “या स्पर्धेतील तुमचे प्रकल्प अप्रतिम आहेत. आता या कल्पनांचे रूपांतर व्यावसायिक उत्पादनांमध्ये (Startups) करा. तुमचे संशोधन पर्यावरणपूरक आणि समाजाला भेडसावणाऱ्या समस्या सोडवणारे असावे, यातच तुमच्या भविष्यातील यशाची गुरुकिल्ली आहे.” स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी संस्थेचे कुलसचिव डॉ. गणेश सुरवसे सर यांनी सर्व विद्यार्ध्यांना मार्गदर्शन करत असताना म्हणाले की, मायक्रो प्रोजेक्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतःच्या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याची, नवीन तंत्रज्ञान समजून घेण्याची आणि संशोधन करण्याची संधी मिळते. प्रत्येक विद्यार्थ्याने जिज्ञासू वृत्ती ठेवून नवनवीन प्रयोग करावेत, अपयशाला न घाबरता त्यातून शिकावे आणि स्वतःमधील सर्जनशीलता विकसित करावी. तसेच पॉलिटेक्निकच्या प्राचार्या मा. डॉ. मृणालिनी जाधव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो आणि त्यांच्या कल्पकतेला योग्य व्यासपीठ उपलब्ध होते. त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून ज्ञान आत्मसात करावे. आपल्या आजूबाजूच्या समस्यांचे निरीक्षण करून त्यावर तांत्रिक व नावीन्यपूर्ण उपाय शोधण्याचा प्रयत्न करावा. संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे सर, कुलसचिव डॉ. गणेश सुरवसे, पॉलीटेक्नीकचे प्राचार्य डॉ. मृणालिनी जाधव, स्पर्धेचे संयोजक प्रा. इस्लावथ पार्वती, पॉलीटेक्नीकचे सर्व विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील उपस्थिती दाखवून कार्यक्रमाचे कौतुक केले. या स्पर्धेचे मूल्यमापन शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. प्रवीण जाधव,डॉ. सुरज नलावडे तसेच औद्योगिक क्षेत्र विशेषज्ञ श्री अमित चव्हाण आणि श्री अजित चव्हाण यांनी केले. स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा. पुनम धुमाळ आणि प्रा. विभक्ती गायकवाड यांनी केले.




