ईपीएस-९५ पेन्शनधारकांचा ५ नोव्हेंबरला कोल्हापूर पीएफ कार्यालयावर मोर्चा व धरणे आंदोलन
किमान ९ हजार रुपये पेन्शन, महागाई भत्ता व आरोग्य सुविधा देण्याची मागणी; १५ व १६ डिसेंबरला दिल्ली येथे देशव्यापी आंदोलन
कोल्हापूर : ईपीएस-९५ पेन्शनधारकांच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकार व कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (ईपीएफओ) लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय संयुक्त कृती समितीच्या वतीने सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील सेवानिवृत्त कर्मचारी दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोल्हापूर येथील प्रॉव्हिडंट फंड विभागीय कार्यालयावर मोर्चा काढून काळी दिवाळी धरणे आंदोलन करणार आहेत.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. धर्मजन व जनरल सेक्रेटरी कॉम्रेड अतुल दिघे यांच्या नेतृत्वाखाली १५ डिसेंबर २०२६ रोजी दिल्ली येथील प्रॉव्हिडंट फंड कार्यालयावर ‘बटवा खोलो, पेन्शन बढाओ’ आंदोलन करण्यात येणार आहे. तर १६ डिसेंबर २०२६ रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘देश बचाओ, पेन्शन बढाओ’ या घोषणेखाली देशव्यापी आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनाची अधिकृत नोटीस पीएफ कमिशनर यांना देण्यात येणार आहे.
ईपीएस-९५ पेन्शनधारकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये किमान मासिक पेन्शन ९,००० रुपये करावी, पेन्शनला महागाई भत्ता लागू करावा, पेन्शनधारकांना मोफत आरोग्य सुविधा द्याव्यात, तसेच पूर्ण वेतनावर पेन्शन मिळण्याचा कर्मचाऱ्यांचा कायदेशीर हक्क मान्य करावा, या मागण्यांचा समावेश आहे.
पूर्ण वेतनावरील पेन्शनसाठी अर्ज केलेल्या कर्मचाऱ्यांची प्रकरणे तातडीने मंजूर करावीत. सन २०१४ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही पूर्ण वेतनावरील पेन्शनचा लाभ मिळावा. तसेच २०१४ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांनाही पूर्ण वेतनावरील पेन्शनचा हक्क मिळावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
सरकारकडून वारंवार आश्वासने मिळत असतानाही पेन्शनधारकांच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने देशभरातील लाखो पेन्शनधारकांमध्ये तीव्र नाराजी आहे. वृद्धापकाळात सन्मानाने जगण्यासाठी पुरेशी पेन्शन, महागाई भत्ता आणि आरोग्य सुविधा मिळणे हा पेन्शनधारकांचा न्याय्य हक्क आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही माहिती सातारा जिल्हाध्यक्ष कॉम्रेड प्रमोद परमणे, सांगली जिल्हाध्यक्ष कॉम्रेड गोपाळ पाटील आणि कोल्हापूर जिल्हाध्यक्ष कॉम्रेड अनंत कुलकर्णी यांनी दिली. पाचही जिल्ह्यांतील ईपीएस-९५ पेन्शनधारकांनी ५ नोव्हेंबर रोजी मोठ्या संख्येने कोल्हापूर येथील पीएफ कार्यालयावरील मोर्चा व काळी दिवाळी धरणे आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.



