बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांच्या सीईटी साठी ऑनलाइन नोंदणी उद्यापासून
दिनांक 29 जून ते 03 जुलै पर्यंत करता येणार नोंदणी, प्रवेश परीक्षा केंद्राकडून माहिती प्रसारित
बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमांसाठी प्रवेश इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून अतिरिक्त सीईटीची घोषणा करण्यात आली होती. सदरच्या अतिरिक्त सीईटीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची प्रक्रिया दिनांक 29 जून पासून सुरू होत आहे विद्यार्थ्यांना 3 जुलै पर्यंत सदरचे अर्ज भरता येणार आहेत.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार यूजीसी व एआयसीटी नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून बीबीए बीसीए या पदवी अभ्यासक्रमांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे हे अभ्यासक्रम इंजीनियरिंग पदवीप्रमाणे एआयसीटीइ च्या नियंत्रणाखाली आल्याने महाराष्ट्र शासनाने बारावी पास विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाची राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सदरच्या अभ्यासक्रमांसाठी सक्तीची केली आहे.
चालू वर्षी बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक आहे. काही विद्यार्थ्यांनी सदरची प्रवेश परीक्षा दिली होती, तर बहुतेक विद्यार्थी अजून देखील प्रवेश परीक्षा देण्यासाठी इच्छुक आहेत. मे महिन्यात झालेल्या प्रवेश परीक्षेमध्ये विद्यार्थी आणि पालकांना त्याची माहिती न मिळाल्यामुळे फारच कमी विद्यार्थी प्रवेश परीक्षेसाठी बसले होते. याच आधारावरती विद्यार्थी पालक आणि शैक्षणिक संस्थांकडून बीबीए आणि बीसीए साठी शैक्षणिक वर्ष 2024 25 साठी पुन्हा एकदा सामाईक प्रवेश परीक्षा घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती.
चालू शैक्षणिक वर्षांमध्ये बीबीए आणि बीसीए या व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेता येणार आहे, विद्यार्थ्यांना विविध वसतिगृहांच्या योजनेचे देखील फायदे मिळणार आहेत. त्यामुळे सीईटी दिलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बीबीए आणि बीसीएच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची उपलब्धता करून ठेवावी असे आवाहन करण्यात आले आहे.सदरच्या अतिरिक्त सीईटीमुळे निधी आणि बीसीएला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
यशोदा मध्ये मार्गदर्शन कक्ष:
यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये बीबीए आणि बीसीए चे प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मोफत माहिती देण्यासाठी, ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. बीबीए आणि बीसीएच्या प्रवेश प्रक्रिये संदर्भात, कागदपत्रांसंदर्भात, आणि करिअर मार्गदर्शन साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस ला भेट द्यावी असे आवाहन यशोदा टेक्निकल कॅम्पसचे कुलसचिव गणेश सुरवसे यांनी केले आहे.
