महाबळेश्वर तालुका कोयना खोरे विकास मंडळाने हातलोट-कासरुड पूलाची पाहणी केली
मुंबई, १७ जून २०२४: महाबळेश्वर तालुका कोयना खोरे विकास मंडळाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत मोरे आणि सरचिटणीस गोविंद मोरे यांनी रविवारी (१६ जून) हातलोट आणि कासरुड गावे जोडणाऱ्या पूलाची पाहणी केली. यावेळी पदाधिकारी आणि तांत्रिक अधिकारी यांच्या उपस्थितीत पुलाच्या बांधकामावर चर्चा झाली.
पावसाळ्यामुळे वाहतुकीची अडचण निर्माण झाल्याचे लक्षात घेऊनही, कामाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी कामे हळूहळू केली जात आहेत, असे श्री मोरे यांनी स्पष्ट केले. पुलाचे पिलर (स्तंभ) उभे केल्यानंतर किमान २१ दिवस त्यावर गर्डर टाकू नये अशी तंत्रज्ञानाची माहिती त्यांनी दिली. एका गर्डरचे वजन सव्वाशे किलो टन असल्यामुळे स्तंभ तुटण्याची शक्यता असते.
कंत्राटदार श्री सूरज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ पर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सध्या जवळपास ८५% काम पूर्ण झाले आहे.
पुलावरील प्लेट टाकून २-३ दिवसात माणसांची तात्पुरती वाहतूक सुरू होईल. पुलापलीकडे असणाऱ्या गाड्या अलीकडे आणण्यासाठी नदीवर भराव टाकून तात्पुरती व्यवस्था केली आहे. पावसाचा जोर वाढण्यापूर्वी पलीकडे असलेल्या वाहनांच्या चालकांना आपली वाहने अलीकडे काढून घेण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.
यावेळी संस्था पदाधिकारी श्री बबन मालुसरे, मारुती जाधव, सुनील जाधव, विजय घाडगे आणि शिवाजी मोरे उपस्थित होते.