साताऱ्याच्या तीन शिलेदारांची मलेशियाला झेप! सक्सेस अबॅकसच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
सातारा( प्रतिनिधी) : बुद्धिमत्ता, जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर सक्सेस अबॅकसच्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी घेतली आहे. मलेशिया येथे दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेसाठी या तीन विद्यार्थ्यांची निवड झाली असून, ते भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु. इशांत रणजित पाटील, कु. पूर्वा अनिल आकिवाटे आणि कु. श्रुतिका अमितकुमार बिरनाळे यांचा समावेश आहे.
अबॅकसच्या माध्यमातून गणितीय कौशल्य, एकाग्रता, अचूकता आणि जलद गणन क्षमता विकसित करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण सरावाला आता आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळणार आहे. मलेशियातील स्पर्धेत विविध देशांतील विद्यार्थी सहभागी होणार असून, या तिन्ही विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मिळवलेली ही संधी निश्चितच जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या या यशामुळे पालक, शिक्षक आणि शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या सक्सेस अबॅकस संस्थेच्या या यशस्वी वाटचालीचेही सर्वत्र कौतुक होत आहे.तिन्ही विद्यार्थ्यांना आगामी स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!



