गावाच्या शाश्वत विकासासाठी संतोष मांढरे यांना सरपंचपदासाठी गावकऱ्यांचा आग्रह
वाई प्रतिनिधी -वेरुळी (ता. वाई) येतील येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेरुळी गावातील माजी सैनिक संतोष मांढरे (फौजी) यांना सरपंच पदासाठी उमेदवारी जाहीर करण्याचा आग्रह गावातील तरुण व ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे. गावाच्या विकासासाठी प्रामाणिक व कर्तबगार नेतृत्वाची गरज असल्याने मांढरे यांनी पुढे यावे, अशी सर्वसामान्यांची भावना व्यक्त होत आहे.
संतोष मांढरे यांनी गावाच्या शाश्वत विकासासाठी ठोस भूमिका मांडली असून, पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी स्वतःच्या मालकीच्या विहिरीतून पाणीपुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच शासन दरबारी पाठपुरावा करून दीर्घकालीन पाणी योजना राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
याशिवाय, गावात स्वयंरोजगार केंद्र स्थापन करून महिला व तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला आहे. अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीट करण्यासाठी प्रयत्न, स्वच्छता व मूलभूत सुविधांचा विकास, तसेच शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्याचा त्यांचा मानस आहे.
सैन्यातील अनुभवाच्या बळावर शिस्तबद्ध, पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन देण्याची ग्वाही संतोष मांढरे यांनी दिली आहे. गावाला आदर्श गाव बनवण्यासाठी पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचाही त्यांचा संकल्प आहे.
दरम्यान, गावातील युवक व ज्येष्ठ नागरिकांनी मांढरे यांनी निवडणूक रिंगणात उतरावे, अशी एकमुखी मागणी केली असून, त्यांच्या उमेदवारीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.




