चिलेवाडीचे जागृत श्री चिलाईदेवी मंदीर
प्रतिनिधी :महाराष्ट्रातील विविध गावांमधून फिरताना आपल्याला अनेक देवी देवतांची मंदिरे, विरगळ, सतीशिळा, शिलालेख पहायला मिळतात काही मंदिरे प्राचीनतेचा वारसा आपल्या अंगाखांद्यावर सांगत गावात मिरवत असतात तर काही आधुनिक काळात झालेले बदल सांगत उभी असतात. काही मंदिरे आपल्या प्रसिद्धीमुळे आकर्षणाची ठिकाणे बनलेली आहेत. तर काही मंदिर आडवाटेवर आणि अपरिचित व उपेक्षित ही आहेत. सातारा जिल्ह्यात अशा मंदिरांची संख्या भरपूर आहे. या मंदिरांची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी असल्यामुळे ही पाहताना त्यांच्यामधील समृद्ध अशा कोरीव कामाचा प्रत्यय आपल्याला येतो.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील भाडळे खोरे आपल्या नैसर्गिक वनसंपदा आणि डोंगररांगासाठी परिचित आहे. या भाडळे खोऱ्यातील चिलेवाडी गावात असणारे ग्रामदैवत श्री चिलाई माता मंदिर असेच एक प्राचीन मंदिर असून आपल्याला प्राचीन आणि पुरातनतेचा वारसा सांगते.
भाडळे या ऐतिहासिक गावास महादेव डोंगर, चुंबळा डोंगर आणि ढोरमारी डोंगर या हिरव्यागार आणि रमणीय डोंगराचा सहवास लाभलेला आहे. या गावाजवळच वसलेल्या चिलेवाडी गावात जागृत श्री चिलाई मातेचे मंदीर असून सकाळची प्रसन्नता तर संध्याकाळची शांतता अनुभवायची असेल तर या मंदिराला आपल्याला भेट द्यायलाच हवी. या मंदिराच्या बाहेरील दोन प्राचीन दीपस्तंभ, जुन्या मूर्ती आणि नवसाला पावणारी देवी यामुळे हे मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.
चिलेवाडी येथील श्री चिलाई मातेच्या या मंदिरापर्यंत जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. जर आपण सातारावरून येत असाल तर सातारा- शिवथर- देऊर- वाठार स्टेशन- विखळे- भाडळे- चिलेवाडी हा एक मार्ग आहे. या मार्गे चाळीस किमीचा प्रवास करून आपल्याला या ठिकाणी येत येते. या मार्गे आपल्याला नागमोडी भाडळे घाटमार्गाचा आनंद घेता येतो. सातारा-वडूथ-सातारा रोड-किन्हई-हिवरे-भाडळे- चिलेवाडी असा दुसरा मार्ग असून या मार्गेही आपण चाळीस किमीचा प्रवास करून या ठिकाणी पोहोचू शकतो.
श्री चिलाई मातेच्या मंदीराचे वातावरण अतिशय पवित्र आणि शांत आहे. श्री चिलाई देवी मंदीर प्राचीन आणि पुरातन असून जुन्या कालखंडापासून त्याने आपला ऐतिहासिक वारसा जपत आपले स्वतंत्र असे स्थान अबाधित ठेवलेले आहे. त्यामुळे या मंदिरांचा इतिहास, त्यांची बांधणी तेथील स्थापत्य कला अभ्यासणे महत्वाचे ठरते. आज इतकी वर्षे होऊन गेली तरी हे मंदीर सुस्थितीत आहेत. चिलेवाडी तसेच भाडळे गावातील कुटुंबीयांनी आणि येथील ग्रामस्थांनी हा मंदीर परिसर फुलझाडे लावून सुशोभित केलेला असून तो अतिशय स्वच्छ आणि सुरेख ठेवलेला आहे. चिलेवाडी गावात प्रवेश करताना हे मंदिर वसलेले असून या मंदिराची स्वच्छता, दिवाबत्ती, देखभाल व सेवा मंदिराचे पुजारी श्री. अनिल सापते आणि श्री. मारुती सापते हे पाहत असून त्यांनी मंदिराची व्यवस्था व्यवस्थित ठेवलेली आहे.
इतर मंदिरांप्रमाणे या मंदिराचाही जीर्णोद्धार झालेला असून या मंदिराचे शिखर रंगरंगोटी केल्याने आकर्षक बनलेले आहे. हे मंदिर प्राचीन आणि पुरातन असून याची बांधणी हेमाडपंथी स्वरुपाची आहे. भाडळे येथील राजेघोरपडे कुटुंबियांच्या नित्य पूजेतील देवता असलेल्या आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले हे चिलाई मंदिर गावात प्रवेश करताना उजव्या बाजूला आपल्याला पहावयास मिळते.
या मंदिराचे प्रवेशद्वार भव्य असून त्याचा गर्भगृहाचा भाग प्राचीन असला तरी त्यावरील वरचा भाग अलीकडे बांधण्यात आलेला असून त्याला रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. मंदिर परिसरात आल्यानंतर मंदिराचा प्रशस्त परिसर पाहून आपण थक्क होतो. मंदिर परिसर भव्य आणि फरशी बसवून सुशोभित करण्यात आलेला आहे. मंदिर परिसरात आणखी एक छोटेसे मंदिर अलीकडे बांधण्यात आलेले आहे. पूर्वाभिमुखी असलेल्या या मंदिरासमोर अलीकडे बांधण्यात आलेली एक दीपमाळ असून तिला आकर्षक रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. त्याच्याजवळ दोन प्राचीन दिपमाळी आहेत. या दीपमाळीजवळ एक सुरेख नंदी आहे. जवळच तुळशी वृंदावन आहे.
अंदाजे बाराव्या- तेराव्या शतकात बांधण्यात आलेले हे मंदिर तीन स्तरात असून ते सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे विभागण्यात आलेले आहे. या मंदिराचा सभामंडप भव्य असून या सभामंडपात पन्नास माणसे सहज बसून शकतील.
सभामंडपामधून अंतराळात प्रवेश करताना हेमाडपंथी धाटणीचे कोरीव नक्षीकाम केलेले सुबक आणि चांगल्या स्थितीतील खांब आपल्याला या मंदिराच्या प्राचीनत्वाची साक्ष देतात. तेथून पुढे आल्यावर मंदिराच्या अंतराळ या भागात आपल्याला नऊ घंटा बांधण्यात आलेल्या दिसतात. या घंटा नवसाच्या घंटा आहेत. यावरून या ठिकाणाचे लोक देवीला नवस बोलून तो पूर्ण झाल्यानंतर मंदिरात घंटा बांधतात.
त्यानंतर अंतराळ भागातून आपला प्रवेश गर्भगृहात होतो. गर्भगृहात जात असताना वरील बाजूस गणेशपट्टी असून त्यातील श्री गजाननाची अतिशय सुरेख मूर्ती आपले लक्ष वेधून घेते. प्रवेशद्वारावर वरील खालील बाजूस कीर्तिमुख कोरलेले आपल्याला पहावयास मिळते. या ठिकाणची सर्व स्वच्छता ठेवत असल्याने या ठिकाणी अतिशय प्रसन्न वाटते.
गर्भगृहात गेल्यावर मध्यभागी आपल्याला सुरेख आणि आकर्षक श्री चिलाई देवीचे दर्शन होते. शेंदरी रंगात असणारी चिलाई देवी भाडळे येथील राजे घोरपडे कुटुंबियांची पूज्यदेवता आहे. या देवीच्या समोर देवीची पितळी मूर्ती असून त्यासमोर पितळी नंदी आहे. या ठिकाणी सतत समई प्रज्वलित असते. या ठिकाणच्या गाभाऱ्यातील वातावरण अतिशय शांत आणि प्रसन्न असते. या जागृत श्री चिलाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर मनाला प्रसन्नता आणि शांतता लाभते. हा मंदीर परिसर अतिशय प्रशस्त आणि रमणीय आहे. हेमाडपंथी धाटणीचे गर्भगृह असणारे हे मंदिर प्राचीन उत्तम शिल्पकलेचा नमुना आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या बांधकामावरून हे मंदिर बाराव्या शतकात बांधलेले असावे असे वाटते. या मंदिर परिसरातील एका पार असून पारावर एक लिंबाचे झाड आहे.
ऐतिहासिक राजेघोरपडे संस्थानातील आणि चिलेवाडी ग्रामस्थांनी या मंदिराची देखभाल चांगल्या पद्धतीने ठेवलेली असल्याने हा पुरातन वारसा म्हणजेच हे श्री चिलाई मंदिर अजूनही भक्कम आणि सुस्थितीत आहे.गावच्या मध्यभागी निरव शांतता असलेले हे मंदीर हे या परिसरातील लोकांचे श्रध्दास्थान आणि ग्रामदैवत असल्याने दर मंगळवारी आणि शुक्रवारी या ठिकाणी भक्तगण दर्शनासाठी मोठया संख्येने उपस्थित असतात. मंदिर परिसर फुलझाडे लावून सुशोभित केलेला असल्याने गावातील लहानथोर आणि वयोवृद्ध लोक तसेच भक्त भाविक सकाळी संध्याकाळी दर्शन घेण्यासाठी या रमणीय ठिकाणी येतात.
श्री चिलाई देवी ही भाडळे या ऐतिहासिक संस्थानातील देवी आहे. मेवाडमधील राणा लक्ष्मणसिंह सिसोदिया यांच्या राजपूत घराण्यातील राणा सज्जनसिंह हे दक्षिणेत म्हणजेच आत्ताच्या महाराष्ट्रात स्वताचे नशीब अजमावण्यासाठी आले. पुढे याच घराण्याच्या भोसले आणि घोरपडे या शाखा झाल्या. त्या घराण्यातील नावजी राजे हे पराक्रमी असल्याने त्यांनी घोरपडे घराण्याचे नाव उज्वल केले. त्यामुळे ते या राजेघोरपडे भाडळे घराण्याचे मुळपुरूष म्हणून ओळखले जातात. या लोकांनी येत असतानाच सिसोदिया घराण्यातील लोकांच्या बरोबरच ही चिलाई देवी झोपडीतील टाक या स्वरूपात या गावात आली. तिच्या वास्तव्याने या गावाचे नाव चिलेवाडी पडले, अशी माहिती राजे घोरपडे कुटुंबियातील भाडळे या ऐतिहासिक संस्थानातील श्री. आनंदराव घोरपडे यांनी दिली.
या चिलेवाडी गावात भाडळे संस्थानातील ऐतिहासिक राजे घोरपडे कुटुंबियातील नावजी राजेघोरपडे महाराजांची समाधी गावाच्या मध्यभागी आहे. अक्षयतृतीयेला या ठिकाणची मोठी यात्रा असते. त्याचबरोबर नवरात्र उत्सवात या ठिकाणचा परिसर भक्तगणांनी फुललेला असतो. नवरात्रीत या ग्रामदेवता असणाऱ्या देवीचा खूप मोठा उत्सव व जागर असतो. आरती, गोंधळ आणि जागरण यांनी हा उत्सव पार पडतो. यावेळी नवरात्रीत घटात तेलवात राजेघोरपडे कुटुंबियातील लोक करतात. असे हे पुरातन श्री चिलाई मंदिर चिलेवाडी गावच्या वैभवात भर घालते.
महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद असलेला म्हस्कोबा डोंगर श्री चिलाई मंदिरासमोरच असून या डोंगरावर म्हस्कोबाचे हेमाडपंथी मंदिर आहे. हे मंदिर कागलच्या घाटगे घराण्याचे देवस्थान असून हे मंदिर त्यांच्या मालकीचे आहे. मोळ, बुध इ. गावात त्यांचे वंशज आहेत. याबरोबरच या परिसरातील राजापूरची श्री जानूबाई, मलवडीचे श्री खंडोबा मंदिर आणि कुळकजाई मंदीर हे सर्व कागलाच्या घाटगे घराण्याच्या मालकीचे आहे.
सातारा ते चिलेवाडी हे अंतर ४० कि.मी. आहे. या मंदिराकडे येताना विखळे गावाजवळील जोगमठ, जवळच असणारा कल्याणगड किंवा नांदगिरीचा ऐतिहासिक किल्ला आपण पाहू शकतो. जवळच्या भाडळे गावातील श्री हनुमान मंदीर, श्री भैरवनाथ मंदीर, श्रीराम मंदीर, श्री दत्त मंदीर, श्री विठ्ठल रखुमाई मंदीर, हेमाडपंथी श्री अमृतेश्वर मंदीर, दोन प्राचीन गुंबज आणि ऐतिहासिक भाडळे संस्थान तसेच प्राचीन अवशेष व दस्तऐवज याबरोबरच वांगणा नदीच्या तीरावर श्री भवानी माता मंदिर आणि त्याच्याजवळ या संस्थानातील ऐतिहासिक राजे घोरपडे कुटुंबियातील नावजी राजेघोरपडे महाराजांची बावीस बाय बावीसची भव्य छत्री आहे. हे सर्व व्यवस्थित पाहण्यासाठी तीन तासांचा वेळ पुरतो.
सातारा येथून असे हे श्री चिलाई मंदिर आणि भाडळे खोऱ्यातील ऐतिहासिक दस्ताऐवज पाहण्यासाठी आपण नक्कीच येऊ शकतो.
सहा.प्रा.सुर्यकांत शामराव अदाटे
प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालय,देऊर
९९७५७५९३२५