सातारा प्रतिनिधी :देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार व छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दणदणीत एकतर्फी विजय मिळवून पुन्हा एकदा दिल्लीचे तख्त काबीज केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आ.शशिकांत शिंदे यांचा त्यांनी सुमारे 30 हजारहुन जास्त मतांनी पराभव केला.
प्रारंभी पोस्टल मतदान मोजणीसाठी घेण्यात आले. मात्र, हा कौल उदयनराजेंच्या विरोधात गेला होता. त्यानंतर ईव्हीएमच्या मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर आ. शशिकांत शिंदे यांनी मताधिक्य घ्यायला सुरूवात केली. काही फेऱ्यांमध्ये त्यांनी आघाडी घेतली होती. मात्र, दुपारनंतर खा. उदयनराजेंनी मताधिक्य घेत विजयाच्या दिशेने वाटचाल केली. ही आघाडी अखेरच्या फेरीपर्यंत कायम राहिली. उदयनराजे विजयी होताच राजधानी साताऱ्यात जल्लोषाला सुरूवात झाली. राजेंच्या मावळ्यांनी फटाके फोडले, गुलाल उधळला. राजधानीत राजेंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार रॅली काढत विजय साजरा केला.