विज्ञान शिकता शिकता जगता आले पाहिजे. – गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे.
तळदेव / महाबळेश्वर – पाठ्यपुस्तकातील विज्ञान केवळ शिकून चालणार नाही तर हेच विज्ञान प्रत्यक्ष जीवनात जगता आले पाहिजे असे प्रतिपादन महाबळेश्वर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनी केले. तीन दिवस चालू असलेल्या महाबळेश्वर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप समारंभ नुकताच संपन्न झाला,त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी कोयना एज्युकेशन सोसायटी,तळदेवचे संचालक डी. एस. जंगम यांची प्रमुख उपस्थिती होती.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरून विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे.तालुका विज्ञान प्रदर्शनाचा फायदा इलाबेन महेता विद्यालयातील तसेच आसपासच्या ग्रामीण विद्यार्थ्यांना झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी व्यासपीठावर शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव धनावडे,केंद्रप्रमुख दगडू ढेबे, संजय पारठे, आनंद संकपाळ, विनायक पवार, नामदेव धनावडे, चंद्रकांत जंगम, इलाबेन विद्यालयाचे मुख्याध्यापक दिपक आखाडे, मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षा शबाना शेख, कार्याध्यक्ष संदिप जाधव विज्ञान मंडळाचे अध्यक्ष निलेश होमकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तीन दिवसीय प्रदर्शनात झालेल्या वक्तृत्व, निबंध, प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धेतील विजेते तसेच वैज्ञानिक उपकरणातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.प्राथमिक गटात प्रथम क्रमांक चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयातील शेतकरी मित्र या उपकरणाने पटकाविला. द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा खरोशी तर तृतीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा कुंभरोशीने मिळवला. माध्यमिक गटात एम. इ. एस हायस्कुल महाबळेश्वरच्या स्मार्ट ट्रान्स्पोर्टशन या उपकरणाला मिळाला. द्वितीय क्रमांक अंजुमन इस्लाम पब्लिक स्कुल, पाचगणी तर तृतीय क्रमांक चेतन दत्ताजी विद्यालय, मेटगुताड यांनी प्राप्त केला. प्राथमिक शिक्षक गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलीचे पदवीधर शिक्षक विष्णू ढेबे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, माध्यमिक शिक्षक गटात चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयाचे विज्ञान शिक्षक निलेश होमकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. विजेत्यांची निवड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी झाली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू ढेबे यांनी केले तर आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख चंद्रकांत जंगम यांनी केले.
