जिल्ह्यातील तरुणाईला लिंब-नागेवाडी आय.टी. पार्कची लागली आस जागेचा ताबा व लँड डेव्हलपमेंट प्रक्रिया गतिमानतेच्या प्रतीक्षेत.

सातारा (श्रीरंग काटेकर )सातारा जिल्ह्यातील भूमिपुत्र उद्योग,व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने पुणे मुंबई पिंपरी चिंचवड व अन्य शहरात स्थलांतरित झालेले आहेत. स्थलांतरित झालेल्या तरुणाईला पुन्हा लिंब नागेवाडी परिसरात निर्माण होत असलेल्या आयटी पार्क मुळे सातारची ओढ लागली आहे. सातारच्या आयटी पार्क कडे डोळे लावून असलेल्या या तरुणाईला आता वेध आपल्या भूमीतील आयटी पार्क कडे लागले आहे. लिंब नागेवाडी परिसरात आयटी पार्कच्या प्रगतीचा ते आढावा घेत आहेत. साताऱ्यातील आपल्या मित्र परिवारांना सातत्याने फोन द्वारे चौकशी ते करीत आहेत. महाराष्ट्र शासनाने लिंब नागेवाडी या ठिकाणी आयटी पार्क उभारणीचा निर्धार केला आहे.आय टी पार्क च्या उभारणीची प्राथमिक मान्यताही दिली आहे. त्यामुळे तरुणाईमध्ये नवा उत्साह व चैतन्य निर्माण झाले आहे. स्थानिक भूमिपुत्रांना स्थानिक ठिकाणीच नोकरीची संधी लाभल्यास वेळ व पैसा वाचू शकतो असे या तरुणांचे मत आहे. जिल्ह्यातील हजारो तरुणाई आज नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने अन्य शहरात कामे करीत आहेत.
त्यांना त्या ठिकाणी अनेक अडचणी वरती मात करावी लागत आहे. तरुणाई पुण्यात ज्येष्ठ नागरिक साताऱ्यात स्थिती असताना साताऱ्यात उभे राहत असलेले आयटी पार्क मुळे एक आशेचा किरण निर्माण झाला आहे. माय भूमीतच रोजगाराची संधी उपलब्ध झाल्यास पुन्हा सातारच्या भूमीकडे येण्याची ओढ या तरुणाईना लागली आहे. याबाबत श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले,सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी घेतलेल्या पुढाकरामुळे हा प्रकल्प निश्चित मार्गी लागेल असा विश्वास तरुणाईला वाटत आहे.
शासन स्तरावरून आयटी पार्कच्या प्रत्यक्ष उभारणीच्या कामाला तातडीने गती मिळावी या प्रतीक्षेत जिल्ह्यातील तरुणाई डोळे लावून पाहत आहेत. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी उर्वरित प्रक्रिया गतिमान करून खऱ्या अर्थाने सातारच्या भूमिपुत्रांचे स्वप्न सत्यात उतरावे अशी अपेक्षा तरुणाई कडून व्यक्त होत आहे. यापूर्वी २९ऑगस्ट २०२५रोजी या परिसरातील पहिल्या टप्प्यातील जवळपास ११३ एकर शासकीय जागेची औद्योगिक महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ड्रोन कॅमेरा द्वारे जागेची पाहणी केली होती. त्यानंतर ९ मार्च २०२६रोजी लिंब नागेवाडी परिसरात औद्योगिक विकास महामंडळ यांच्या वतीने फलकाची उभारणी केली. फलकाच्या उभारणीमुळे जिल्ह्यातील तरुणांच्या आशा पल्लवीत झाल्या असताना आता या जागेचा ताबा व लँड डेव्हलपमेंट प्रक्रियेस प्रारंभ कधी होणार याकडे तरुणाई चे डोळे लागले आहेत.
सातारच्या उद्योग विश्वाची गतिमानतेने प्रगतीसाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणारे श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अथक परिश्रमातून लिंब नागेवाडी परिसरात आयटी पार्क ची उभारण्याचे स्वप्न सत्यात येत आहे. त्याचबरोबर सातारा एमआयडीसी च्या नवीन व जुन्या औद्योगिक क्षेत्राचाही विकासाचे शिवधनुष्य लोकप्रतिनिधींनी हाती घेतले आहे. नुकतेच मुंबई येथे उद्योग मंत्री ना. उदय सामंत त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सातारच्या जुन्या व नवीन एमआयडीसी मधील प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घेत सातारच्या एमआयडीसी मधील उद्योग व्यवसायांना पाणीपुरवठा अल्प प्रमाणात होत असल्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी सातारच्या एमआयडीसी च्या पाणीपुरवठासाठी १४कोटी रुपयांचा निधीची तरतूद करून दिले आहे. त्यामुळे सातारा एमआयडीसी मधील उद्योजकांना भेडसावणारा पाण्याचा प्रश्न आता नजीकच्या काळात मार्गी लागेल असा विश्वास आता उद्योजकांना वाटू लागला आहे.
श्रीरंग काटेकर सातारा




