‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत वडूजमध्ये भव्य तिरंगा रॅली; हुतात्म्यांच्या नगरी वडूजमध्ये राष्ट्रभक्तीचा जागर; मंत्री जयकुमार गोरे तिरंगा रॅलीत सहभागी
वडूज : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी, खटाव तालुक्याच्या वतीने हुतात्म्यांची नगरी वडूज येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे सपत्नीक सहभागी झाले. यावेळी त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन करून राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला.
रॅलीपूर्वी वडूज येथील हुतात्मा स्मारकावर हुतात्मा परशुराम घार्गे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून रॅलीचा शुभारंभ झाला.
या भव्य तिरंगा रॅलीत लोकप्रतिनिधी, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी-कर्मचारी, युवक-युवती तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात तिरंगा घेऊन नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण वडूज शहर राष्ट्रभक्तीच्या वातावरणाने भारावून गेले.
यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्ह्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची आठवण करून दिली. ९ सप्टेंबर १९४२ रोजी ‘छोडो भारत’ आंदोलनादरम्यान हुतात्मा परशुराम घार्गे यांच्या नेतृत्वाखाली वडूज येथे काढण्यात आलेल्या मोर्च्यावर ब्रिटिशांनी केलेल्या गोळीबारात नऊ स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिल्याचा इतिहास त्यांनी अधोरेखित केला.
हुतात्म्यांच्या त्यागाची प्रेरणा लाभलेल्या वडूज नगरीत आयोजित या तिरंगा रॅलीतून राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशभक्तीची भावना आणि स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची स्मृती जागविण्यात आली.





