पुणे-बंगळुरु महामार्गावर शिरवळजवळ भीषण अपघात; मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर
खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावर शिरवळ (ता. खंडाळा) येथील हॉटेल शिवालयसमोर मंगळवारी (दि. 11 ऑगस्ट) रात्री सव्वा एकच्या सुमारास कार व ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी झाले. ह सर्वजण मावळ-तळेगाव दाभाडे परिसरातील होते. कारमधून महाबळेश्वर या ठिकाणी फिरायला जात असताना हा अपघात झाला. टाटा नेक्सॉन कार डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये जाऊन समोरून येणाऱ्या आयशर ट्रकवर जोरदार आदळल्याने हा भीषण अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम.एच. 12 एल.जे.3033 क्रमांकाची टाटा नेक्सॉन कार साताऱ्याच्या दिशेने निघाली होती. शिरवळ येथील हॉटेल शिवालय समोर आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव कार रस्त्याच्या मधील डिव्हायडरवरून विरुद्ध लेनमध्ये गेली आणि समोरून येणाऱ्या आयशर ट्रकवर जोरदार धडकली. धडक एवढी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या दुर्घटनेत पुणे जिल्ह्यातील वेदांत अर्जुन वारंगे (वय-19 रा. तळेगांव दाभाडे ता. मावळ), सोनुसिंग धीरेंद्र ठाकूर (वय 19 रा. कामशेत ता. मावळ), आदित्य बाळासाहेब गरुड (वय 19 रा टाकवे ता. मावळ) आणि निखिल बाळू राऊत (वय 20 रा. कामशेत ता. मावळ) या चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
तर मयूर हनुमंत शिंदे (वय-20) आणि दीक्षित दयानंद पुजारी (वय-20) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.अपघाताची माहिती मिळताच शिरवळ पोलिसांनी तसेच परिसरातील स्थानिक युवकानी आणि शिरवळ रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच मृतदेह व जखमींना बाहेर काढण्याचे काम करण्यात आले.





