सत्यशोधक लोकशाहीर पुंडलिक फरांदे यांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न
सातारा : सत्यशोधक लोकशाहीर पुंडलिक फरांदे यांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘माणुसकीचा शाहीर’ या शोभाताई फुले लिखित चरित्रग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच गोडोली येथील नगरपालिका शाळा क्रमांक २३ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर, माजी डीवायएसपी विवेक लावंड, केबीपी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. ए. सी. आत्तार, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ज्ञानदेव मस्के, ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते प्राचार्य अरुण गाडे, नगरसेविका हेमलता भोसले, मोनिकाताई घोरपडे, सीमाताई भोसले, आशाताई बाचल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाहीर वैभव फरांदे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी १९९८ साली प्रतिष्ठानची स्थापना झाल्याची माहिती देत लोककलावंतांसाठी शासनाकडून मिळालेल्या अनुदानाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच वृद्ध कलाकारांना मानधन मिळत असल्याबद्दल शासनाचे आभार मानले. फरांदे कुटुंबीय गेली अनेक वर्षे कलाकार आणि समाजकार्यासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. माजी नगरसेविका अनिता फरांदे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
नगराध्यक्ष अमोल मोहिते म्हणाले, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी पोवाड्यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. त्याच परंपरेतील लोककलावंतांचे कार्य प्रेरणादायी आहे. लोककलावंतांसाठी लवकरच सुसज्ज सभागृह उभारण्याचा प्रयत्न करू.”
उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “लोकशाहीर पुंडलिक फरांदे यांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचे कार्य केले असून त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.”
यावेळी दुबईमध्ये ‘शिवगर्जना’ सादर करून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या श्रेयांश वजरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ज्ञानदेव मस्के यांनी लोकशाहीर पुंडलिक फरांदे यांना आदरांजली वाहत त्यांच्या साहित्याने समाजाला दिशा दिल्याचे सांगितले. त्यांच्या विचारांचा वारसा फरांदे परिवार जपत असून तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, लोककलावंत, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





