सहकार भूषण धन्वंतरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ. रवींद्र नामदेव भोसले यांची ‘महाराष्ट्र राज्य पतसंस्था समन्वयक’ पदी बिनविरोध निवड; सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण
सातारा -सहकार क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी, प्रदीर्घ अनुभव आणि पारदर्शक प्रशासकीय कौशल्याची दखल घेऊन सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन मा. डॉ. रवींद्र नामदेव भोसले यांची महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या “समन्वयक” पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे राज्यातील सहकार आणि पतसंस्था चळवळीला नवचैतन्य आणि अधिक गतिशीलता मिळेल, असा ठाम विश्वास संपूर्ण सहकार क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.
डॉ. रवींद्र नामदेव भोसले यांनी धन्वंतरी पतसंस्थेची स्थापना केली आणि गेली ३७ वर्षे सातत्यपूर्ण ‘अ’ ऑडीट वर्ग मिळवून देत संस्थेला सहकारात अग्रगण्य स्थान मिळवून दिले. केवळ सहकार क्षेत्रातच नव्हे, तर वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातही (सेंट्रल कौन्सिल ऑफ होमिओपॅथी, दिल्लीचे सदस्य आणि सावकार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य) त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या अष्टपैलू आणि अभ्यासू नेतृत्वाचा थेट फायदा आता महाराष्ट्रातील हजारो पतसंस्थांना आणि त्यांच्या लाखो सभासदांना होणार आहे
महाराष्ट्र राज्यातील आर्थिक कणा समजल्या जाणाऱ्या सहकारी पतसंस्थांना सध्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत प्रा. डॉ. भोसले यांच्या सारख्या अभ्यासू आणि कार्यकुशल नेतृत्वाची समन्वयक पदी झालेली निवड अत्यंत आश्वासक मानली जात आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील छोट्या-मोठ्या पतसंस्थांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे शासनासमोर मांडले जातील आणि त्यावर सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास सहकार तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
डॉ. रवींद्र नामदेव भोसले यांनी धन्वंतरी पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे. केवळ सहकारच नव्हे, तर वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. या नियुक्तीनंतर राज्य सरकार, सहकार विभाग आणि नागरी व ग्रामीण भागातील सर्व पतसंस्था यांच्यात मजबूत समन्वय घडवून आणण्याची मुख्य धुरा आता डॉ. रविंद्र भोसले यांचेकडे असेल.
या निवडीबद्दल बोलताना डॉ. रविंद्र भोसले म्हणाले, “माझ्यावर सोपवलेली ही जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडेन. राज्यातील सर्व पतसंस्थांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि सहकार चळवळ अधिक लोकाभिमुख करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.”त्यांच्या या बिनविरोध निवडीचे वृत्त समजताच महाराष्ट्रभरातील विविध संस्था आणि शुभचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





