गुरुपौर्णिमा आणि वृक्षारोपणाचा संगम; अॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी प्रेरणादायी उपक्रम

पाचगणी प्रतिनिधी -पांचगणी दि. 29 जुलै २०२६ रोजीअमर एज्युकेशनल अँड सोशल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संचलित अॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे गुरुपौर्णिमा व वृक्षारोपण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण, भक्तिमय व पर्यावरणपूरक वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये गुरुंबद्दल आदरभाव, संस्कारांची जपणूक तसेच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात ज्ञान देवता सरस्वती माता, छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सामूहिक प्रार्थना, गुरुस्तवन, स्वागतगीत व प्रेरणादायी गीत सादर करून वातावरण भक्तिमय केले.
कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक विश्वस्त मा. श्री. अमर विजय बिरामणे, मा. श्री. विजय बिरामणे, मा. सौ. रंजना विजय बिरामणे , मा. सौ. सारिका नरेंद्र बिरामणे आणि मा. सौ. प्रज्ञा अमर बिरामणे मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी गुरूंचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व, भारतीय संस्कृतीतील गुरू-शिष्य परंपरा, शिक्षणाचे महत्त्व आणि आदर्श विद्यार्थी कसा असावा याविषयी प्रभावी भाषणे सादर केली. काही विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेवर आधारित कविता, मनोगते आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

मुख्याध्यापकांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, “गुरू हा विद्यार्थ्याच्या जीवनातील ज्ञानाचा दीपस्तंभ असतो. गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडते. शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारी यांचे पालन करणे ही प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी आहे.” प्रमुख पाहुण्यांनीही विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक बांधिलकी याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शाळेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मान्यवर, पालक आणि विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची फळझाडे, औषधी वनस्पती, फुलझाडे व सावलीची झाडे लावली. प्रत्येक रोपाला संरक्षणासाठी आधार देण्यात आला तसेच नियमित पाणी देणे, खत टाकणे आणि संगोपन करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांना देण्यात आली. “एक विद्यार्थी – एक वृक्ष” हा संदेश देत पर्यावरण संवर्धनाची शपथही सर्वांनी घेतली.पांचगणी गिरीस्थान नगरपरिषद, आणि प्लॅन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नेस्ले समर्थीत हिलदारी अभियाना अंतर्गत
कार्यक्रमादरम्यान स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि वृक्षसंवर्धन याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. वृक्षांचे महत्त्व, वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि हरित पर्यावरणाची गरज याविषयी शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी भविष्यात अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुरूंबद्दल आदरभाव वाढण्यास, भारतीय संस्कृतीची ओळख होण्यास तसेच पर्यावरण रक्षणाची जाणीव दृढ होण्यास मोठी मदत झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शिक्षकवृंदांनी उत्कृष्टरीत्या केले. सूत्रसंचालन कु. अर्श अहंमद आणि कु. नैतिक भोईर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सौ. साजिया पठाण यांनी मानले. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.





