महाबळेश्वर-तापोळा रस्ता ३ वेळा खचला; प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिक अन् प्रवासी त्रस्त तात्पुरती मलमपट्टी नको, भक्कम दुरुस्तीची गरज नगरपालिकेला जनरोषाचा इशारा
महाबळेश्वर:महाबळेश्वर-तापोळा रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत चालली असून, गेल्या अवघ्या दोन दिवसांत हा रस्ता तब्बल तीन वेळा खचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महाबळेश्वर नगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या या मुख्य रस्त्याची वारंवार दुरवस्था होत असल्याने, या भागातील स्थानिक नागरिक, पर्यटक आणि प्रवाशांना गेल्या दोन-तीन दिवसांपासून नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रस्ता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात खचल्यामुळे या मार्नावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.आणीबाणीच्या प्रसंगी एकमेव मुख्य मार्ग बंद!तापोळा भागातून महाबळेश्वर शहरात येण्यासाठी आणि कोणत्याही आणीबाणीच्या (इमर्जन्सी) प्रसंगी वैद्यकीय किंवा इतर तातडीच्या मदतीसाठी हा एकमेव मुख्य रस्ता आहे. हाच मार्ग बंद पडल्यामुळे रुग्णांचे, नोकरदारांचे आणि विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. दरवेळी रस्ता खचल्यानंतर प्रशासनाकडून केवळ तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी केली जाते, ज्यामुळे काही तासांतच पुन्हा रस्ता धसतो.
▪️नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
नगरपालिकेच्या या ढिम्म कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
▪️तात्पुरती नाही, कायमस्वरूपी उकल हवी: या रस्त्याला आता तात्पुरत्या मलमपट्टीची नाही, तर तांत्रिकदृष्ट्या अत्यंत भक्कमपणे पुनर्रचना आणि दुरुस्ती करण्याची तातडीची गरज आहे.
▪️डोळे उघडे ठेवून काम करा: प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखून आणि डोळे उघडे ठेवून या रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
इशारा:जर महाबळेश्वर नगरपालिकेने या समस्येकडे गांभीर्याने दुर्लक्ष करून लवकरात लवकर भक्कम दुरुस्ती केली नाही, तर येत्या काही दिवसांत प्रशासनाला स्थानिक नागरिकांच्या तीव्र रोषाचा आणि आंदोलनाचा सामना करावा लागणार हे निश्चित आहे.





