यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या हस्ते वृक्षारोपण व विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे. वृक्षारोपण ही एकदिवसीय कृती नसून वृक्षांचे संगोपन आणि पर्यावरण संरक्षणाची सातत्यपूर्ण जीवनशैली अंगीकारणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी तथा सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक मा. श्री. अमोल सातपुते यांनी केले.
यशोदा टेक्निकल कॅम्पस येथे आयोजित वृक्षारोपण अभियान व विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेच्या परिसरात मा. अमोल सातपुते यांच्या हस्ते विविध देशी वृक्षांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेत परिसर अधिक हिरवागार करण्याचा संकल्प व्यक्त केला.
यानंतर आयोजित विद्यार्थी मार्गदर्शन सत्रात बोलताना श्री. सातपुते यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व, जलसंधारण, हवामान बदलाची आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. आधुनिक विकास आणि पर्यावरण यामध्ये समतोल राखणे ही आजच्या तरुण पिढीची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याने दरवर्षी किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
भारतीय वन सेवेतील आपल्या प्रवासाविषयी बोलताना त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी, यशासाठी आवश्यक असलेले सातत्य, शिस्त, वेळेचे नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी केवळ गुण नव्हे, तर मूल्याधिष्ठित शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणाप्रती संवेदनशीलता तितकीच आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यांचा उपयोग समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी करावा, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या वनसंवर्धन उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांनी वन विभागाच्या विविध जनजागृती मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे देत त्यांना करिअर, पर्यावरण आणि व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मौलिक मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपात यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रा. डॉ. दशरथ सगरे यांनी सांगितले की, वृक्षारोपण हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून भावी पिढ्यांसाठी समृद्ध आणि सुरक्षित पर्यावरण निर्माण करण्याचा दृढ संकल्प आहे. आज लावलेले प्रत्येक झाड उद्याच्या समाजाला प्राणवायू, स्वच्छ हवा आणि निरोगी जीवन देणारे अमूल्य वरदान ठरणार आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमाची भावना रुजविणे हे यशोदा टेक्निकल कॅम्पसचे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रा. डॉ. दशरथ सगरे,चंद्रकांत वंजारी, राजेश वंजारी, संजय शेलार,रजिस्ट्रार, विविध विभागांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
या प्रसंगी संस्थेच्या वतीने मा. अमोल सातपुते यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या वृक्षारोपण आणि मार्गदर्शन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण होण्याबरोबरच स्पर्धा परीक्षा, प्रशासकीय सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्व यांविषयी सकारात्मक प्रेरणा मिळाली. यशोदा टेक्निकल कॅम्पसतर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी मनःपूर्वक स्वागत केले.




