सहकाराची नवी क्रांती ‘भारत टॅक्सी’मुळे प्रवासी आणि चालकांसाठी प्रवासाचा नवा अध्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई, दि. २३ (विमाका): सहकाराची नवी क्रांती ‘भारत टॅक्सी’मुळे प्रवासी आणि चालकांसाठी प्रवासाचा नवा अध्याय असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली देशात सुरू झालेली ही सहकार क्षेत्रातील भारत टॅक्सी मॉडेल संकल्पना प्रवाशांना रास्त भाड्यात सुरक्षित प्रवास देणारी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रांगणात आज केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष सोहळ्यात ‘भारत टॅक्सी’ (BHARAT TAXI) सेवेचा अधिकृत शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ओला आणि उबरसारख्या खासगी ॲग्रीगेटर्सनी आजवर वाहतूक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे. मात्र, सण-उत्सव किंवा पावसाच्या काळात प्रचंड भाडेवाढ (Dynamic Pricing) करून सर्वसामान्य प्रवाशांची होणारी लूट आणि चालकांवर लादले जाणारे अवाजवी कमिशन या दोन्ही गोष्टींमुळे प्रवासी व चालक दोन्ही अडचणीत येत होते. या पार्श्वभूमीवर भारत टॅक्सीच्या माध्यमातून सहकार क्षेत्राच्या ताकदीवर एक अत्यंत पारदर्शक, सुरक्षित आणि स्वस्त पर्याय उभा राहिला आहे. एकाच मोबाईल ॲपद्वारे कार, ऑटो-रिक्षा आणि बाईक टॅक्सी अशा तिन्ही प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, मध्यस्थांची साखळी मोडीत काढून थेट चालक आणि प्रवाशाला जोडणारी ही क्रांती ठरेल. पहिल्या दीड किलोमीटरसाठी केवळ ३१ रुपये आणि त्यानंतर प्रति किलोमीटर २१ रुपये असा काळी-पिवळी टॅक्सीच्या धर्तीवर निश्चित केलेला सुटसुटीत दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
नवी मुंबई विमानतळ परिसरातील स्थानिक आणि प्रकल्पबाधितांच्या अनुषंगाने बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, या नव्या वाहतूक व्यवस्थेमुळे या भागातील भूमिपुत्रांना आणि तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. डिजिटल स्वाक्षरीसह राज्य सरकारने ॲग्रीगेटर धोरणाची चौकट आखून दिली असून, संपूर्ण आर्थिक व्यवहारांवर सहकार विभागाचे नियंत्रण असणार आहे. पहिल्या टप्प्यात ६०० टॅक्सींचे अनावरण करण्यात आले असून आगामी काळात १००० पेक्षा जास्त टॅक्सींचा टप्पा गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांमधून या सेवेचा पहिला टप्पा सुरू होत असून, आगामी काळात ही सेवा महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवून प्रवाशांना अधिक सुरक्षित व सुखद अनुभव देण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.




