हिरवाईसाठी सातारकरांचे एक पाऊल‘वायसी’च्या पुढाकाराने पर्यावरण संवर्धनाला नवी दिशा
सातारा (शिवाप्पा पाटील ): पर्यावरणाचे संवर्धन आणि हिरवाई वाढवण्यासाठी येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे. महाविद्यालयाच्यावतीने राबवण्यात आलेल्या ‘एक पाऊल हिरवाईकडे’ या उपक्रमांतर्गत आज गुरुवार (ता. २३) रोजी महत्त्वपूर्ण पर्यावरणपूरक अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात बेल, वड, पिंपळ, आवळा, कडूनिंब, हिवर, चिंच, पेरू, आंबा, जांभूळ तसेच विविध फुलझाडांसह हजारो फळझाडे व औषधी वनस्पतींच्या रोपांचे मोफत वाटप करून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा प्रत्यक्ष संदेश देण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे उपस्थित होते. उपप्राचार्य नंदिनी साळुंखे, उपप्राचार्य डॉ. जे. जे. चव्हाण, सहायक पर्यवेक्षक एन. ए. पाटील व आर. आर. खोत यांची यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. प्रा. एस. बी. कुऱ्हे-नांदे यांनी प्रास्ताविक केले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना सुनील भोईटे यांनी निसर्ग घटकांच्या महतीची जाणीव करून दिली. “वनस्पतींशिवाय मानवाचे अस्तित्व अशक्य आहे. झाड हे सजीव आहे. झाड लावून ते जगवले नाही, तर तो एक प्रकारचा खूनच आहे,” असे स्पष्ट शब्दांत सांगत उपस्थितांना अंतर्मुख केले. बदलते हवामान, अनियमित पर्जन्यमान आणि विस्कळीत होत चाललेले निसर्गचक्र यावर मात करण्यासाठी वृक्षसंवर्धन हा एकमेव प्रभावी मार्ग असल्याचे त्यांनी नमूद केले. आपण निसर्गाच्या आधारे जीवन जगलो आहोत. आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत, असा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. आज पर्जन्यमान अनियमित झाले असून निसर्गचक्र बदलत आहे. ते पूर्ववत करण्यासाठी वनस्पती संवर्धन हाच एकमेव मार्ग आहे, असेही श्री. भोईटे म्हणाले. ‘वायसीआयएस’ कॉलेजचा हा पथदर्शी उपक्रम सर्वांसाठीच आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी संत तुकाराम महाराजांच्या पर्यावरणविषयक विचारांचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक रोपाचे झाडात रूपांतर होईपर्यंत काळजी घेण्याचे आवाहन केले. दरम्यान प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांनी दहीवडी महाविद्यालयात ५ हजारांहून अधिक वृक्ष लागवड व संवर्धनाचा यशस्वी उपक्रम राबविल्याचा ‘एक झाड लाव, माणसा..!’ हा प्रेरणादायी माहितीपट सभागृहात प्रदर्शित करण्यात आला. उपप्राचार्य नंदिनी साळुंखे यांनी पर्यावरण ग्रेडसाठी एक अनोखा उपक्रम सुचवला. अकरावी आणि बारावीत प्रत्येकी ६ जिओ-टॅग्ड फोटोंद्वारे विद्यार्थ्यांनी स्वतः लावलेल्या आणि वाढवलेल्या झाडांची नोंद ठेवावी, तरच पर्यावरणाचे खरे मूल्य समजेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
उपक्रमासाठी विविध प्रकारच्या वनस्पतींची रोपे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष परिश्रम घेणारे रसायनशास्त्र विभागाचे प्रा. सचिन गोरे यांचा प्राचार्य आणि मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गुरूकुल विभाग प्रमुख एस. एस. भंडारे, प्रा. व्ही. जे. मोहिते, प्रा. संभाजी देशमुख, प्रा. अविनाश ढेबे, प्रा. सत्वशीला काळे आदींची उपस्थिती होती.
‘एक पाऊल हिरवाईकडे..’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि निसर्ग जपणुकीची प्रेरणा मिळाली. पुस्तकांच्या पलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी करायचे, हा ध्यास घेऊन ‘वायसी’च्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी उचलली असून त्यांनी साताऱ्याला हिरवे करण्याचा संकल्प केला आहे. ‘या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यावरण समिती सदस्य प्रा. धनश्री जरे, प्रा. सचिन मांडके, प्रा. ए. जे. सातपुते, प्रा. आकाशी पाटील यांनी परिश्रम घेतले. प्रा. डी. ओ. खंडाईत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. के. पी. पाटील यांनी आभार मानले.





