‘वायसी’च्या ‘एन्जॉय एक्झाम टेक्निक्स’ कार्यशाळेचा जल्लोषात समारोप
एक्झामच नव्हे तर लाइफ एन्जॉय करण्याची टेक्निक मिळाल्याची विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त भावना
सातारा (शिवाप्पा पाटील ): विद्यार्थ्यांमधील परीक्षेची भीती दूर करणाऱ्या, विद्यार्थ्यांच्या विचारांमध्ये आमुलाग्र बदल घडविणाऱ्या आणि यशस्वी जीवनाचा मंत्र देणाऱ्या ‘एन्जॉय एक्झाम टेक्निक्स’ अर्थात ‘परीक्षा आनंदाने जिंकूया, टॉपर बनूया..’ या तीन टप्प्यांत आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यशाळांचा समारोप बुधवार (ता. २२) रोजी उल्हसित वातावरणात झाला. या कार्यशाळेच्या मालिकेला विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. १०, १५ आणि २२ जुलै रोजी संपन्न झालेल्या उपक्रमाचा शेकडो विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. हा उपक्रम प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपप्राचार्य नंदिनी साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पडला.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे होते. यावेळी सेवानिवृत्त सेनाधिकारी तथा पुणे येथील प्रेरणादायी समुपदेशक डॉ. राजेंद्र मोरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले. व्यासपीठावर ओयासिस टीमच्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉ. निलम सकुंडे-कदम, पर्यवेक्षक एन. ए. पाटील, प्रा. व्ही. एस. राऊत उपस्थित होते.
प्रारंभी प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत अशा कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. संवादात्मक आणि प्रेरणादायी शैलीत मार्गदर्शन करताना डॉ. राजेंद्र मोरे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी समस्त मानवजातीच्या सेवेसाठी सदैव तयार राहावे. हिम्मत न हारता प्रत्येकजण जग जिंकू शकतो, अशी प्रबळ इच्छाशक्ती बाळगा. स्वतःचे मित्र बना. आयुष्यातील सर्वांत मोठी दौलत म्हणजे मित्र असून मित्र कमवायला शिका. स्वतःला मदत करायला सुरुवात केली की इतरही मदतीसाठी पुढे येतात. यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम आपली मानसिकता बदलली पाहिजे.’
कार्यशाळेच्या समारोप सत्रात विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या भावना हेच या उपक्रमाचे सर्वांत मोठे यश ठरले. तन्वी कदम, सिद्धी तांबोळी, वरद भुसारी, आस्था सुतार, प्रणिता सकटे, आरजू सय्यद, श्रद्धा कुंभार यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना, “हा आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस होता. हा खरोखरच लयभारी कार्यक्रम होता. खूप काही शिकायला मिळाले. मनाला नवी ‘हिलिंग पॉवर’ मिळाली. नकारात्मक विचारांचे सकारात्मक ऊर्जेत रूपांतर करण्याचे तंत्र अवगत झाले. कृतज्ञता आणि क्षमाशीलतेची भावना अधिक दृढ झाली. नवीन मित्र मिळाले, स्वतःला ओळखण्याची आणि आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळाली. सर्वांना सोबत घेऊन कसे पुढे जायचे, हे शिकलो. या कार्यशाळेत केवळ ‘एक्झाम एन्जॉय’ करण्याचीच नव्हे, तर ‘लाइफ एन्जॉय’ करण्याची टेक्निक मिळाली,” अशा उत्स्फूर्त भावना व्यक्त केल्या. तसेच त्रिशा फडतरे, ओम निकम यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन, प्रभावी अभ्यासतंत्र, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाचा नवा मंत्र मिळाल्याचे सांगत आयोजकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्टुडंट ॲक्टिव्हिटी कमिटीचे प्रमुख प्रा. वैभव राऊत, प्रा. अश्विनी जाधव, प्रा. शुभांगी ढेरे, प्रा. वैशाली लिगाडे, ओआयटी विभागाचे रवींद्र कुलकर्णी, निलकंठ पवार यांच्यासह कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. प्रा. अजिता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. संभाजी देशमुख यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला नवी दिशा देणाऱ्या, परीक्षेविषयीची भीती दूर करून आत्मविश्वास, सकारात्मकता आणि जीवनाकडे नव्या नजरेने पाहण्याची प्रेरणा देणाऱ्या या कार्यशाळेचा समारोप टाळ्यांच्या कडकडाटात, उत्साहपूर्ण वातावरणात आणि महामानवांच्या, भारतमातेच्या जयघोषाने झाला. या कार्यशाळेचा महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांना प्रचंड प्रमाणात लाभ झाला असून परीक्षेकडे एका आनंदी उत्सवासारखे पाहण्याची ऊर्जा घेऊन विद्यार्थी या समारोप सत्रातून बाहेर पडले.





