भारत पेट्रोलियम कंपनीच्या वतीने वाई परिसरात विविध सामाजिक उपक्रम
वाई -देशपातळीवरील भारत पेट्रोलियम कंपनीच्या वतीने ‘स्वच्छता पखवाडा’ उपक्रमांतर्गत वाई परिसरातील विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.
या कार्यक्रमांतर्गत भारत पेट्रोलियमच्या वाई एमआयडीसी येथील प्लाॅंटच्या वतीने बावधन हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कंपनीचे टेरिटरी मॅनेजर संजीव गौड यांच्या मार्गदर्शनाखाली मॅनेजर गौरव गुप्ता, प्लांट मॅनेजर विश्वजीत चौधरी, अरुणराज पी व्ही यांच्या हस्ते बावधन हायस्कूल मधील हुशार, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वह्,या कंपास पेटी वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक एम. ए. मुकादम, महेंद्र पिसाळ, भारत पेट्रोलियम कंपनीचे प्रतिनिधी समीर पटवर्धन, विजय मालुसरे, कुनाल आदेसरा आदी उपस्थित होते.
कंपनीच्या वतीने बावधन हायस्कूल त्याचप्रमाणे सुलतानपूर व शेलारवाडी या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलींसाठी शौचालय बांधून देण्यात येणार असल्याचे कंपनीच्या वतीने यावेळी सांगण्यात आले. कंपनीच्या वाई प्लांटच्या मार्फत दरवर्षी असा उपक्रम राबवण्यात येतो त्यामध्ये वाय परिसरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना उपयोगी असे साहित्य वाटप व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी प्रयत्न करण्यात येतात अशी माहिती कंपनीचे अधिकारी संजीव गौड यांनी दिली. कंपनीच्या या उपक्रमाबद्दल विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले.





