कृषी पायाभूत सुविधा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
सातारा: भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेंतर्गत शेतीसाठी आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यासाठी सवलतीच्या कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. तरी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.
या योजनेमुळे शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक, प्रक्रीया, वाहतूक व विपणन यांना चालना मिळून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. योजनेअंतर्गत पात्र सामान बैंकमार्फत मंजूर होणाऱ्या कर्जावर रु. २ कोटीपर्यंतच्या कर्जासाठी ३ टक्के व्याज सवलत तसेच क्रेडिट गॅरंटीची सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून दिली जाते. योजनेअंतर्गत पात्र प्रकल्पामध्ये गोदामे, शीतगृहे, पॅक हाऊस, ग्रेडिंग व सॉर्टिंग युनिट, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, कृषी लॉजिस्टिक्स, सायलो, रिपनिग चेंबर, ई-मार्केट सुविधा, जैव-इनपुट उत्पादन युनिट, कस्टम हायरिंग सेंटर तसेच इतर कृषी पायाभूत सुविधा प्रकल्पाचा समावेश आहे.
वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी / संस्था FPO), प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS), सहकारी संस्था, कृषी उद्योजक, स्टार्टअप्स, स्वयं सहायता गट व कृषी क्षेत्रातील इतर पात्र संख्या योजनेसाठी पात्र आहेत. शेतकऱ्यानी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी https://agriinfra.dac.gov.in या संकेतस्थळावर आपले आवेदन सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फारांदे यांनी केले आहे.





