पुसेगाव परिमंडळात वन्यजीव संवर्धनासाठी वनविभागाची धडाडी; जनजागृतीमुळे मानव-वन्यजीव संघर्षात घट
पुसेगाव, दि. १९ : खटाव तालुक्यातील पुसेगाव वन परिमंडळात वन्यजीव संरक्षण, वनसंवर्धन आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाकडून विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. वनपाल राजाराम काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक व वनसेवकांची टीम रात्रंदिवस कार्यरत असून, जनजागृती आणि तत्पर सेवेमुळे स्थानिक ग्रामस्थांकडूनही वनविभागाला चांगले सहकार्य मिळत आहे.
पुसेगाव परिमंडळातील ३६ गावांमध्ये वन्यजीव संवर्धनाबाबत सातत्याने जनजागृती केली जात आहे. बिबट्याचा वावर असलेल्या भागांमध्ये नियमित रात्रगस्त घालण्यात येत असून, शिकारीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. तसेच ग्रामसभांमधून नागरिकांना वन्यजीवांचे महत्त्व, अन्नसाखळी आणि वन्यप्राणी आढळल्यास घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
एखादा वन्यप्राणी जखमी झाल्याची किंवा गावात शिरल्याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचून आवश्यक ती कार्यवाही करतात. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पशुहानी झाल्यास तत्काळ पंचनामा करून आवश्यक कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केली जातात. त्यामुळे नागरिकांमध्ये वनविभागाबद्दल विश्वास निर्माण झाला असून, वन्यजीव दिसल्यास ग्रामस्थ स्वतःहून वनविभागाशी संपर्क साधत आहेत.
“मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे. जनजागृती, रात्रगस्त आणि तातडीची मदत यामुळे वन्यजीव संरक्षणाबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य दिले जात आहे,” असे वनपाल राजाराम काशीद यांनी सांगितले.
वनपाल राजाराम काशीद यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या उपक्रमांचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत असून, वन्यजीव आणि पर्यावरण संरक्षणासाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे.




