महाबळेश्वरच्या नव्या पोलीस निरीक्षकांची ‘ॲक्शन’ स्टाईल; चार दिवसांतच आपत्ती व्यवस्थापनात पुढाकार
महाबळेश्वर :महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच आपल्या कामाच्या नियोजनबद्ध आणि तत्पर पद्धतीची छाप उमटविली आहे. तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना त्यांनी स्वतः विविध आपत्कालीन ठिकाणांची पाहणी करून पोलिस यंत्रणेला सज्ज ठेवत प्रभावी समन्वय साधल्याने शहरवासीयांकडून त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नावली, वाडकुंभरोशी, आंबेनळी घाट, तापोळा मार्ग आदी भागांमध्ये दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
नावली येथे दरड कोसळल्यानंतर मातीचा मलबा हटविण्याचे काम सुरू असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तापोळा–महाबळेश्वर मार्गावर दरड व माती आल्याने संबंधित विभागाशी समन्वय साधून रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, आंबेनळी घाट वाहतुकीसाठी बंद असल्याची सूचना असूनही काही वाहने महाबळेश्वरच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने बॅरिकेड्स उभारून मार्ग पूर्णपणे बंद केला. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली.
तसेच ६ जुलै रोजी तापोळा परिसरात रस्त्यावर झाड कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत संबंधित यंत्रणांच्या मदतीने झाड हटवून वाहतूक सुरळीत केली. या सर्व घटनांमध्ये पोलीस निरीक्षक गालिंदे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून समन्वय साधल्याने कामाला गती मिळाली.
महाबळेश्वर शहरवासीयांकडूनही त्यांच्या कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. “पोलीस केवळ कायदा व सुव्यवस्था राखणे किंवा गुन्ह्यांचा तपास करणे एवढ्यापुरते मर्यादित नसून आपत्तीच्या काळात नागरिकांच्या मदतीला धावून जाणारी यंत्रणा आहे, याची प्रचिती नव्या पोलीस निरीक्षकांच्या कामातून येत आहे,” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
अवघ्या चार दिवसांतच नियोजन, तत्परता आणि प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून काम करण्याच्या शैलीमुळे पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांच्या कार्याची महाबळेश्वर तालुक्यात सर्वत्र चर्चा सुरू झाली असून आगामी काळातही अशीच प्रभावी कार्यपद्धती कायम राहील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.





