अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता ‘आंबेनळी घाट’ चार दिवस बंद; जिल्हा प्रशासनाचे आदेश
महाबळेश्वर:रायगड आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा महाबळेश्वर,पोलादपूर अंबेनळी घाट मार्ग पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सुरक्षिततेच्या कारणास्तव दि. ३ जुलै २०२६ ते दि. ६ जुलै २०२६ या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. पावसाळ्यातील अतिवृष्टी आणि संभाव्य भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन जिल्हादंडाधिकारी किशन ना. जावळे यांनी यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
घाट बंद असण्यामागची प्रमुख कारणे:
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या अहवालानुसार, हा मार्ग अतिसंवेदनशील आणि भूस्खलन प्रवण क्षेत्रात येतो. पावसाळ्यात दरडी कोसळणे, वृक्ष उन्मळून पडणे, रस्ता खचणे आणि धुक्यामुळे कमी दृश्यमानता अशा कारणांमुळे अपघाताची शक्यता जास्त असते. जीवितहानी टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
प्रशासनाचे महत्त्वाचे निर्देश:
१ पूर्ण बंदी: दि. ३ जुलै ते ६ जुलै २०२६ या चार दिवसांच्या कालावधीत सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
२.ऑरेंज व रेड अलर्ट: जिल्ह्यामध्ये पावसाचा ‘ऑरेंज’ किंवा ‘रेड’ अलर्ट असल्यास हलक्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश आहेत.
३.रात्रीची बंदी:पावसाळ्याच्या कालावधीत रात्रीच्या वेळी या मार्गावरून कोणत्याही वाहनांना प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग:
प्रशासनाने वाहनचालकांसाठी खालील पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत:
माणगाव – ताम्हिणी मार्गे – पुणे – सातारा.
पोलादपूर – चिपळूण – पाटण – सातारा – कोल्हापूर.
जिल्हा प्रशासनाने सर्व वाहनचालकांना या आदेशाचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, संबंधित पोलीस आणि महसूल यंत्रणेला या मार्गावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.




