महाबळेश्वरच्या ग्रामीण भागात असणाऱ्या दुधगाव आरोग्य उपकेंद्रावरती लाखोंचा निधी पडूनही ‘दुधगाव उपकेंद्र’ कागदावरच?

महाबळेश्वर:महाबळेश्वरसारख्या दुर्गम आणि अतिपावसाळी भागातील ग्रामीण जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दुधगाव येथील आरोग्य उपकेंद्रासाठी तब्बल १५ महिन्यांपूर्वी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर होऊनही, प्रशासकीय उदासीनता आणि अक्षम्य दुर्लक्षामुळे हे उपकेंद्र अद्याप केवळ कागदावरच अडकून पडले आहे.
निधी उपलब्ध, तरीही बांधकामाचा पत्ता नाही:
सप्टेंबर २०२५ मध्ये दुधगाव येथील आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीसाठी ५५ लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला होता. प्रशासकीय स्तरावर निधीची उपलब्धता होऊनही, गेल्या १५ महिन्यांत या उपकेंद्राच्या कामाची एक वीटही रचली गेलेली नाही. पावसाळी आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, हा मुख्य उद्देशच प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे धुळीस मिळाला
गोरगरीब ग्रामीण जनतेचा जीव धोक्यात
महाबळेश्वर परिसरातील आरोग्य व्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याने सामान्य नागरिकांना उपचारासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत आहे. रस्ते आणि दुर्गमतेमुळे वेळेवर उपचार मिळत नाहीत, परिणामी अनेकदा रुग्णांना जीव गमवावा लागतो. “घरातील व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी रुग्णालय गाठण्यापर्यंतच्या प्रवासात अजून किती जणांचा बळी जाणार?” असा संतप्त सवाल आता गोरगरीब ग्रामीण जनता उपस्थित करत आहे.
प्रशासनाची भूमिका काय
प्रशासकीय अनास्थेमुळे ५५ लाखांचा निधी शासकीय तिजोरीत पडून आहे आणि दुसरीकडे नागरिक उपचारासाठी वणवण भटकत आहेत. आता तरी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दुधगाव उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करणार का? की हा निधी केवळ कागदोपत्रीच राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय मंत्री मकरंदआबा पाटील यांनी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची या भागातील जनतेची अपेक्षा आहे.




