मराठी शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टी माफ कालगाव ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय : मातृभाषेतील शिक्षणाला बळ देण्यासाठी सरपंच सोमनाथ चव्हाण यांचा पुढाकार

कराड( ज्ञानेश्वर शेवाळे)-मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, विद्यार्थीपट वाढला पाहिजे आणि ग्रामीण भागातील मातृभाषेतील शिक्षण बळकट झाले पाहिजे, या उद्देशाने कालगाव ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक व धाडसी निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या मासिक सभेत लोकनियुक्त सरपंच सोमनाथ चव्हाण यांनी मांडलेल्या ठरावाला सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. त्यानुसार, जे पालक आपल्या पाल्याचा प्रवेश कालगावातील मराठी शाळेत घेतील, त्या कुटुंबाची संपूर्ण घरपट्टी माफ केली जाणार आहे.
सध्या इंग्रजी माध्यमाच्या आकर्षणामुळे ग्रामीण भागातील मराठी शाळांचा पट दिवसेंदिवस घटत आहे. अनेक ठिकाणी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.मातृभाषेतून शिक्षण घेणारे विद्यार्थी कमी होत आहेत, ही गंभीर बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने हे ठोस पाऊल आहे
सरपंच सोमनाथ चव्हाण म्हणाले, “मराठी शाळा ही आपली संस्कृती आहे. ती टिकली नाही तर भाषा आणि ग्रामीण शिक्षण व्यवस्था धोक्यात येईल. पालकांनी कोणत्याही दबावाखाली न येता मुलांना मराठी शाळेत घालावे, यासाठी आम्ही घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा शाळा वाचवण्याचा प्रयत्न आहे.”
या निर्णयाचे गावातील पालक, शिक्षकवर्ग व शिक्षणप्रेमींनी उत्स्फूर्त स्वागत केले आहे. मुख्याध्यापक नाव म्हणाले, “ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे शाळेतील पट नक्की वाढेल. मुलांना मातृभाषेतून संकल्पना लवकर समजतात. हा निर्णय इतर गावांसाठी दिशादर्शक ठरेल.”
कालगाव ग्रामपंचायतीचा हा उपक्रम सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. मराठी शाळांच्या संवर्धनासाठी थेट आर्थिक सवलत देणारी कालगाव ही राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. इतर ग्रामपंचायतीही याच पद्धतीचा अवलंब करतील, असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.मराठी अस्मिता जपण्यासाठी उचललेले हे पाऊल भविष्यात नक्कीच फलदायी ठरेल, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.




