पुरस्कार प्रदान व पुस्तक प्रकाशन सोहळा ७ जून रोजी साताऱ्यात
सातारा, प्रतिनिधी : पसायदान प्रतिष्ठान, गुहागर (जि. रत्नागिरी) आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान समारंभ व पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन शनिवार, दि. ७ जून २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल, सातारा येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात पसायदान प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असून स्मृतिशेष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार दिवाकर कृष्ण आचार्य यांच्या ‘पीळ’ या कादंबरीला प्रदान केला जाणार आहे. तसेच श्री. भारत सासणे उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार अनंता सूर यांच्या ‘खांदे मळणी’ या कथासंग्रहाला जाहीर झाला आहे.
पसायदान राज्यस्तरीय उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कारासाठी चंद्रकांत बाबर यांच्या ‘यामिनी आणि इतर दीर्घ कविता’, सौ. सोनिया पाटील यांच्या ‘थिजलेल्या माणुसकीचा गहिवर’ आणि रचना यांच्या ‘पुष्परचना’ या कवितासंग्रहांची निवड करण्यात आली आहे.
याच कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक बाळासाहेब लबडे यांच्या ‘बुटक्यांचे बेट’ या कादंबरीचे प्रकाशन होणार आहे. अर्थव पब्लिकेशन, जळगाव यांनी प्रकाशित केलेल्या या कादंबरीच्या प्रकाशनामुळे साहित्यविश्वात विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे हे राहणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक प्रमोद बापू कोपर्डे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच अखिल भारतीय साहित्य संमेलन, साताराचे आयोजक विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक मंगीलाल राठोड, लेखक शिरीष चिटणीस, ज्येष्ठ कवी प्रा. महादेव रोकडे यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक दिबा पाटील (सांगली) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
साहित्य, संवेदना आणि सर्जनशीलतेचा गौरव करणाऱ्या या सोहळ्यास साहित्यप्रेमी, लेखक, कवी आणि वाचकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




