कास तलावातील शोधमोहीमेला यश; 70 ते 80 फूट खोल पाण्यातून मृतदेह बाहेर
सातारा तालुक्यातील कास तलाव परिसरात रविवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर सुरू करण्यात आलेल्या शोधमोहीमेला अखेर यश आले आहे. संग्राम भंडारे (वय 45 वर्षे, रा. वनवासवाडी, सातारा) यांचा पाय घसरून पाण्यात पडल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सुमारे 6.45 वाजण्याच्या सुमारास घडली होती.
घटनेनंतर छत्रपती शिवेंद्रराजे भोसले रेस्क्यू टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेत शोध व बचाव मोहीम सुरू केली. कास तलावाची मोठी खोली, पाण्यातील कमी दृश्यमानता आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे शोधकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरत होते. मात्र रेस्क्यू टीमने अथक प्रयत्न, धाडस आणि कौशल्याच्या जोरावर शोधमोहीम सुरू ठेवली.
अखेर तलावातील सुमारे 70 ते 80 फूट खोल पाण्यात अडकलेला मृतदेह शोधून बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले. या मोहिमेमुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.




