महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात ऐतिहासिक निर्णय:बावनकुळे यांनी केली वचन पूर्ती
महाबळेश्वर: येथील ऐतिहासिक आणि शासकीय बंगल्यांची पिढ्यानपिढ्या निगा राखणाऱ्या माळी कामगारांच्या हक्काच्या घरांचा प्रश्न आता कायमचा सुटला आहे. मुंबई येथील मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात झालेल्या एका विशेष बैठकीत, या कुटुंबांना मालकी हक्काची जागा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे गेल्या १०० वर्षांपासून भूमीहीन असलेल्या सुमारे ६० कुटुंबांना प्रत्येकी १५०० चौरस फूट जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पालिका निवडणुकीत भाजपाचे रवींद्र कुंभारदरे यांच्या सह पाच उमेदवारांच्या प्रचारासाठी बावनकुळे हे महाबळेश्वर येथे आले होते तेव्हा त्यांनी प्रचार सभेत माळी कामगारांना हक्काची घरे देण्याचे आस्वासन दिले होते त्याची पूर्ती त्यांनी मंत्रालयात बैठक घेऊन केली
महाबळेश्वरमधील केअरटेकर आणि माळी समाजाच्या व्यथा मांडण्यासाठी नगरसेवक रवींद्र कुंभारदरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नेत्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रालयात भेट घेतली होती. बावनकुळे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने आपल्या दालनात बैठक बोलावली. “ज्या हातांनी महाबळेश्वरचे सौंदर्य शंभर वर्षे जपले, त्या हातांना हक्काच्या घराची चावी मिळालीच पाहिजे,” अशी भूमिका घेत त्यांनी प्रशासनाला ठोस आदेश दिले.
महाबळेश्वरमध्ये शासनाने भाडेपट्ट्यावर दिलेल्या बंगल्यांमध्ये स्थानिक लोक ब्रिटिश काळा पासून माळी कामगार म्हणून कार्यरत आहेत,हे बंगले विकले गेल्यास या कुटुंबांना रस्त्यावर यावे लागत असे, कारण त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे घर नव्हते., नवीन शासकीय निर्णय २०२५ नुसार, पात्र ६० कुटुंबांना प्रत्येकी सुमारे १५०० चौरस फूट जागा राहण्यासाठी देण्याचे मान्य करण्यात आले आहे.,महसूल मंत्र्यांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना या सर्व कुटुंबांचे तातडीने सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बैठकीत केवळ माळी मराठा समाजाचाच नव्हे, तर महाबळेश्वरमधील इतर प्रलंबित प्रश्नांवरही तोडगा काढला आहे.पुराव्याअभावी अडकलेले घरांचे प्रस्ताव केवळ एका पुराव्यावर निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले.
महाबळेश्वरमधील सोसायट्यांना दिलासा देण्यासाठी त्यांचे ‘वर्ग २’ मधून ‘वर्ग १’ मध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला गती दिली.या निर्णयचा शहरातील तीनशे कुटुंबान्ना याचा फायदा होणार आहे
तालुक्यातील ३६ गावांमध्ये आर.पी. नुसार ६५० चौ. मी. च्या मर्यादेत गावठाण जाहीर करण्याबाबत सूचना दिल्या.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात झालेल्या या निर्णयामुळे महाबळेश्वरमधील कष्टकरी वर्गाला मोठे सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य लाभणार आहे. पिढ्यानपिढ्या सुरू असलेला हा लढा आता विजयात रूपांतरित झाला असून, लवकरच या कुटुंबांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न साकार होईल.
या संपूर्ण लढ्याचे नेतृत्व रवींद्र कुंभारदरे यांनी केले, तर भाजपचे सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी याकामी मोलाचे मार्गदर्शन केले. मंत्रालयातील या बैठकीला नगराध्यक्ष सुनील शिंदे डी.एम. बावळेकर, प्रशांत भोईटे ,सनी मोरे ,लक्ष्मण कोंढाळकर,सुनील ढेबे, दिलीप वागदरे, लक्ष्मण उतेकर, सचिन उतेकर, अनेक पदाधिकारी उपस्थित होते.




