गोमातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करा; महाबळेश्वर तहसीलदारांना गोरक्षकांचे निवेदन
महाबळेश्वर: गोमाता ही भारतीय संस्कृतीचा आधारस्तंभ असून, तिला तात्काळ ‘राष्ट्रमाता’ म्हणून घोषित करावे आणि गोवंश हत्याबंदी कायद्याची संपूर्ण देशात कठोर अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागणीसाठी आज महाबळेश्वर येथे ‘गोसन्मान अभियानांतर्गत’ भव्य निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील पूजनीय संत-महंत, गोपालक आणि गोरक्षकांच्या वतीने हे निवेदन तहसीलदार महाबळेश्वर यांच्या माध्यमातून भारताचे महामहीम राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महामहीम राज्यपाल यांना पाठवण्यात आले.
महत्वाच्या मागण्या:
निवेदनात प्रामुख्याने खालील मागण्यांवर जोर देण्यात आला आहे:
राष्ट्रमाता दर्जा: गोमातेचा सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा जपण्यासाठी तिला अधिकृतपणे ‘राष्ट्रमाता’ घोषित करण्यात यावे.
कठोर कायदे:गोरक्षण आणि गोवंश हत्याबंदी कायद्याची केवळ कागदावर नव्हे, तर जमिनी स्तरावर अत्यंत कडक अंमलबजावणी व्हावी.
सुरक्षा: गोरक्षण करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि गोपालकांना संरक्षण मिळावे.
लोकसहभाग आणि स्वाक्षरी मोहीम:
या अभियानांतर्गत तालुक्यातील शेकडो गोरक्षक आणि गोपालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, या निवेदनासोबत तालुक्यातील हजारो नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र जोडण्यात आले आहे, जे जनभावनेचे प्रतीक आहे.
हे निवेदन देताना महाबळेश्वर तालुक्यातील प्रमुख गोरक्षक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये *सनी मोरे, बाळासाहेब पांचाळ, अनिल लांगी, गौरव जाधव, विनोद दळवी, तेजस कात्रट, किरण ढेबे, आविष्कार केळगणे, अनिल भिलारे* यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी आणि गोप्रेमींचा समावेश होता.
यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी सांगितले की, गोमाता वाचली तरच आपली संस्कृती आणि शेती वाचेल. सरकारने आमच्या भावनांचा आदर करून त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा हे अभियान अधिक तीव्र केले जाईल.”महाबळेश्वर तहसीलदारांनी सदर निवेदन स्वीकारून ते पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठवण्याचे आश्वासन दिले आहे.




