शेततळे योजनेवर भर द्यावा – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई -कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर कृषी विषय प्रभावीपणे हाताळण्यासाठी कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. उद्भवू शकणाऱ्या संभाव्य अडचणींचा पूर्वानुमान करून त्यासाठी आवश्यक तयारी करण्यावर भर देण्यात आला आहे.
यंदाच्या पावसातील अनिश्चिततेमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना वेळेवर खतांचा पुरवठा होणे अत्यावश्यक आहे. विशेषतः डीएपी खताचे वितरण नियोजनबद्ध पद्धतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश दिले जाणार आहेत. खते आणि बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सर्व विक्री केंद्रांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे भरणे यांनी सांगितले.
कृषिमंत्री भरणे म्हणाले की, पावसाच्या अनियमिततेमुळे चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावरही उपाययोजना करण्यात येत आहेत. महाबीज तसेच इतर बियाणे व चारा पुरवठा करणाऱ्या संस्थांना आवश्यक साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुबार पेरणीची वेळ उद्भवल्यास अतिरिक्त बियाण्यांचा पुरवठा करण्यासाठीही संबंधित संस्थांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना पाणी साठवणुकीसाठी शेततळे योजना प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात यावा. त्यासाठी आवश्यक साहित्य, विशेषतः प्लास्टिक लाइनिंग उपलब्ध करून देण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.




