खटावच्या सुपुत्राचा वन सेवेत डंका : राजाराम काशीद यांना राज्य शासनाचे रजत पदक जाहीर
सातारा प्रतिनिधी – वन व वन्यजीव व्यवस्थापन क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खटाव तालुक्यातील सुपुत्र राजाराम काशीद (वनपाल, रोड) यांना महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडून सन 2024-25 साठी रजत पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर झाल्याने वन विभागात आनंदाचे वातावरण आहे.
गेल्या चार वर्षांत काशीद यांनी कास पठार, वजराई-भांबवली धबधबा तसेच रोहोट परिमंडळात वन्यजीव संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. विशेषतः वन्य प्राण्यांसाठी नैसर्गिक पाणवठे स्वच्छ ठेवणे, त्यांची दुरुस्ती करणे आणि कृत्रिम पाणवठे निर्माण करणे यावर त्यांनी भर दिला. या उपक्रमांमुळे सांबर, भेकर, रानगवा, साळींद्र, अस्वल यांसारखे विविध वन्यप्राणी सुरक्षितपणे पाणी पिताना आढळत आहेत.
वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती करणे, रेस्क्यू ऑपरेशन राबवणे आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी शाळा, ग्रामसभा व ग्रामस्थांच्या बैठका घेणे यामध्येही त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. त्यांच्या या प्रयत्नांना रोहोट परिमंडळात चांगले यश मिळाले आहे.
काशीद यांनी तयार केलेल्या सुमारे ५० कृत्रिम पाणवठ्यांमुळे वन्य प्राण्यांची तहान भागवण्यास मोठी मदत होत आहे. “वन आहे तर जीवन आहे” हा संदेश देत त्यांनी ग्रामीण भागात पर्यावरण संवर्धनाबाबत प्रभावी जनजागृती केली आहे.
वन व वन्यजीव व्यवस्थापनातील या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांची निवड रजत पदकासाठी केली असून, त्यांच्या या यशामुळे खटाव तालुक्याचे नाव राज्यभर गाजले आहे.
याबाबत अमोल सातपुते (उपवनसंरक्षक, सातारा), प्रदीप रौंदळ (सहाय्यक वनसंरक्षक, वनीकरण, सातारा) तसेच संदीप जोपाळे (वनपरिक्षेत्र अधिकारी, सातारा) यांनी राजाराम काशीद यांचे विशेष अभिनंदन केले.
दरम्यान, “वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळेच मला हा सन्मान प्राप्त झाला,” अशी प्रतिक्रिया राजाराम काशीद वनपाल रोहोट यांनी व्यक्त केली.




