महाबळेश्वर आगाराच्या एसटी बसेसची अवस्था ‘रामभरोसे’भूमीपुत्र उपमुख्यमंत्री मायभूमीतील अन्यायाकडे लक्ष देणार का?
सामान्य प्रवाशांचा जीव धोक्यात;आंबेघर जवळ बस पुन्हा बंद पडल्याने संताप
महाबळेश्वर:पर्यटनाची पंढरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्र्यांची कर्मभूमी असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील एसटी प्रवाशांचा प्रवास आता जीवावर बेतू लागला आहे. महाबळेश्वर आगारातील गाड्यांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, या बसेस प्रवाशांना नेण्यासाठी आहेत की केवळ ‘भंगार’ वाहून नेण्यासाठी, असा संतप्त सवाल आता जनता विचारू लागली आहे.

काल महाबळेश्वर-सातारा मार्गावर धावणारी बस आंबेघर जवळ अचानक बंद पडली. भररस्त्यात बस निकामी झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. हे चित्र आता महाबळेश्वर तालुक्यासाठी नवीन राहिलेले नाही. आगाराच्या बहुतांश गाड्यांची दुरवस्था झाली असून, प्रवासादरम्यान गाड्या बंद पडणे किंवा त्यांचे सुटे भाग निखळणे हे नित्याचेच झाले आहे. अशा परिस्थितीत प्रवास करणे म्हणजे स्वतःच्या जीविताशी खेळण्यासारखेच आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षावर टीका
‘एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का?’ असा सवाल प्रवासी करत आहेत. महाबळेश्वर आगाराला नवीन बसेस मिळण्याऐवजी केवळ जुन्या आणि खिळखिळ्या झालेल्या बसेस दिल्या जात असल्याचा आरोप होत आहे. ही बाब केवळ संतापजनक नसून सामान्य माणसाला ‘भगवान भरोसे’ सोडून देणारी आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या मायभूमीतच अन्याय?
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री हे महाबळेश्वर तालुक्यातील सुपुत्र आहेत, याचा संपूर्ण तालुक्याला सार्थ अभिमान आहे. मात्र, दुर्दैव असे की, ज्या तालुक्याने राज्याला नेतृत्व दिले, त्याच तालुक्यातील एसटी आगारावर अन्याय होत आहे. उपमुख्यमंत्र्यांच्याच मायभूमीत प्रवाशांना अशा खडतर आणि धोकादायक प्रवासाला सामोरे जावे लागत असल्याने जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
जनतेची मागणी महाबळेश्वर हे जागतिक पर्यटन स्थळ असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची आणि स्थानिक ग्रामस्थांची वर्दळ असते. तरीही महाबळेश्वर आगाराला नवीन आणि दर्जेदार बसेस उपलब्ध करून देण्यात प्रशासन का अपयशी ठरत आहे? या संदर्भात महाबळेश्वर आगाराला आणि येथील जनतेला न्याय मिळणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तात्काळ नवीन बसेस उपलब्ध करून देऊन प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.




