अगणित आनंदाचे, तेजोमयी झाड : प्रा. मा. के. यादव प्रा.भारत कुरे सेवानिवृत्त रयत सेवक, रयत शिक्षण संस्था, सातारा
माणसाचं आयुष्य म्हणजे जीवनगंगेचा एक प्रवाह ! या प्रवाहाच्या किनाऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारची माणसे भेटतात, मात्र त्यातील काही उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या माणसांचे महत्त्व व स्थान हृदयातील ठोक्यांच्या स्पंदनांसारखं असतं. ती स्पंदनं कधीही दिसत नाहीत; पण त्यांचं अस्तित्व मात्र सदैव जाणवत राहतं. असंच एक आमचं हृदयस्पंदन, प्रेरणास्रोत म्हणजे आमचे पंढरपूर कॉलेज मधील गुरुवर्य प्रा.मा.के. यादव सर! त्यांचं सातारा येथे वयाच्या ८६ व्या वर्षी ०६ मार्च २०२६ रोजी वार्धक्याने दुःखद निधन झाले. “जन्मले जे ,मृत्यू त्याला, ठेविलेला मागुनी |” हे वाक्य जरी खरं असले तरी, त्यांचे अचानक जाणे आम्हा सर्वांना चुटपुट लावून गेले. मागे वळून पाहताना त्यांच्या सहवासातील अनेक आठवणी मनात गर्दी करतात. सरांचा प्रेरणादायी गुरू, रयत सेवक, प्राचार्य, वक्तृत्व मार्गदर्शक, नाट्य दिग्दर्शक व अक्षय प्रेरणास्रोत म्हणून चार तपांचा सहवास लाभला. त्यांचे अध्यापन इतके प्रभावी प्रेरणादायी, हृदयस्पर्शी होते, की त्यामुळे सहा वर्षात त्यांची एकही तासिका मी बुडविली नाही. त्यांच्या मराठी विषयाच्या प्रभावी अध्यापनामुळे मी स्वतः, लक्ष्मण गोडसे, अशोक डोळ, विकास वाघ,दत्तात्रय पाटील, दत्ता माने, दशरथ धायगुडे, श्याम साळुंखे, राम पवार, रघुनाथ पवार, विनय बडवे, नलिनी उत्पात, लक्ष्मणराव ढोबळे इत्यादी सर्वजण मराठी विषयाचे चाहते झालो व पुढे प्राध्यापकही झालो, एवढेच नव्हे तर, नानासाहेब लिगाडे, पंजाबराव रोंगे या सारखे इतर विषयांचे विद्यार्थीही त्यांचे चाहते झाले. पुढे लिगाडे सर प्राध्यापक, सूतगिरणीचे चेअरमन झाले, तर पंजाबराव रोंगे प्राचार्य झाले. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यांनी लिहिलेले आत्मचरित्रपर पुस्तक “दुःख कैसे फुल झाले,” दुसरे चरित्रपर पुस्तक “आधुनिक मीराबाई साध्वी राधा अक्का, त्यांनी दिलेली प्रबोधनपर व्याख्याने व पत्रातून केलेले प्रेरणादायी मार्गदर्शन या गोष्टी माझ्या बाबतीत फार मोलाच्या ठरल्या. त्यामुळे मीही घडत गेलो. त्यांच्या चार तपाच्या सहवासातून त्यांची स्नेहशील- मदतशीलवृत्ती, निर्मळ मनाची श्रीमंती व प्रेरणादायी अक्षय ऊर्जा दिसून आली. त्यांचा सहवास म्हणजे एक प्रेरणादायी प्रकाश पर्वच होते जे आम्ही अनुभवले . आदरणीय मा. के. यादव सर म्हणजे आमच्या मनाचा हळवा कोपरा, अगणित तेजोमय आनंदाचे झाड, आदराने व भक्तीभावाने घ्यावयाचे नाव! त्यांनी व तत्कालीन प्रा. डॉ. वा. पु.गिंडे, प्रा.बी.पी. पाटील यांनी आपल्या प्रभावी प्रेरणादायी अध्यापन- मार्गदर्शन व दिग्दर्शनातून आमचे आयुष्य प्रकाशमान केले. त्यांची वंदनीय चरण कमळं .आज आमच्या समोर नसली तरी, ती आमच्या आमच्या कायम मनात आहेत!
“स्मृतिगंध भरला उरात,
येतो कोठून कळेना !
जड शब्दांच्या स्पर्शाने,
पाणी डोळ्यात मावेना!”
सरांच्या आत्म्यास चिरशांती व सद्-गती लाभो! आदरणीय सरांच्या सूर्यप्रकाशी पवित्र स्मृतींना कोटी कोटी वंदन- अभिवादन!




