अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » प्रशासकीय » दुर्गम कांदाटी खोऱ्यातील प्रेमळ माणसांसाठी लिहिली ‘भिनवाडा’- बाळासाहेब कांबळे

दुर्गम कांदाटी खोऱ्यातील प्रेमळ माणसांसाठी लिहिली ‘भिनवाडा’- बाळासाहेब कांबळे

दुर्गम कांदाटी खोऱ्यातील प्रेमळ माणसांसाठी लिहिली ‘भिनवाडा’- बाळासाहेब कांबळे

      कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठात अभ्यासक्रमित ‘भिनवाडा’ कादंबरीवर संवाद’

सातारा :’. महाबळेश्वर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं थंड हवेच ठिकाण, पर्यटन ठिकाण, अगदी तिथल्या गुलाबी थंडीचा अस्वाद या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत पण असे असले तरी कोयनेचे जे मूळ आहे त्या कोयना जलाशयाच्या बॅक वॉटरच्या प्रदेशात आजही दळणवळणाची साधने,भौतिक सोई सुविधा, शिक्षण,आरोग्य याबाबतच्या समस्या तिथल्या माणसांच्या दररोजच्या जगण्याला त्रासदायक ठरत असतात. तिथल्या लोकांचा जीवनसंघर्ष आहे तो मला भिनवाडा कादंबरीतून मांडावा वाटला.अनोळखी शिक्षकाला आधार देणारी प्रेमळ माणसे मी अनुभवली. परिस्थिती बिकट असली तरी माणसही जिद्दीने जगणारी आहेत .काहीही नसले तरी आपण आपल्या मनाच्या शक्तीवर आपण सम्यक जगू शकतो अशी शिकवण देणारी भिनवाडा ही गोष्ट आहे. शिक्षकाची नोकरी करत असताना कांदाटी नदीच्या खोऱ्यातील माणसांनी आधार दिला. या प्रेमळ माणसांच्या चांगुलपणातून उतराई होण्यासाठी मी ‘भिनवाडा’ कादंबरी लिहिली’ असे प्रतिपादन कादंबरीचे लेखक बाळासाहेब कांबळे यांनी कृतज्ञतापूर्वक व्यक्त केले. ते कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या बी.ए .भाग ३ च्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात भिनवाडा या कादंबरीचा समावेश केल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होण्यासाठी आयोजित केलेल्या ‘साहित्य संवाद’या विशेष कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या भाषामंडळाचे प्रभारी संचालक व मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुभाष वाघमारे होते,तर या कादंबरीवर भाष्य करण्यासाठी निमंत्रित केलेले भरतगाव येथील लेखक,सुनील शेडगे,तसेच विश्वजित जाधव,सौ.कुंदा कांबळे,विनोद कांबळे,महेश तांबेकर,सुजित वाघमारे इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे भाषा मंडळ ,मराठी विभाग व वाड्मय मंडळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते .

         कादंबरीच्या संदर्भाने माहिती देत असताना खरोशी येथे घडलेल्या बोट दुर्घटनेचा उल्लेख करून ते पुढे म्हणाले की’ कोयना जलाशयाच्या बॅकवॉटर परिसरातील लाँच चालवणाऱ्या कष्टकरी स्थानिकांचे रोजगार बुडाले.कोयना, कृष्णा, वेणा, गायत्री आणि सावित्री नद्यांच्या उगमभूमीत असलेला हा भरपूर पावसाचा प्रदेश, निसर्गसंपन्न असला, तरी मानवी संघर्षाने व्यापलेला आहे. दुर्गम भागात शिक्षक म्हणून रुजू होताना आलेले अनुभव, अंधारात, पावसात, जंगलातून केलेला प्रवास, अनोळखी माणसानी दिलेला आधार, आणि त्या माणुसकीच्या ओलाव्यातून निर्माण झालेली कृतज्ञता—यांतूनच भिनवाडा कादंबरीचा जन्म झाल्याचे त्यांनी सांगितले. मानवी जीवनाचे शाश्वत सत्य प्रेम, माया आणि जिव्हाळा हेच आहे. ग्रामीण भागामध्ये ज्ञानाचा प्रमुख स्त्रोत म्हणून पाहिलं तर ते फक्त प्राथमिक शिक्षण आहे. प्राथमिक शिक्षणाचं सक्षमीकरण व्हावं म्हणून प्राथमिक शाळांमध्ये विविध शाळा कमिट्यांची स्थापना केली. पालकांचा शाळांशी समन्वय होऊन शिक्षणाचा विस्तार व्हावा आणि मुलांची गुणवत्ता वाढावी हा हा उद्देश होता पण स्कूल कमिट्यातून गावचं राजकारण शाळेत आल्यामुळे शिक्षणाचा मूळ उद्देश बाजूला गेला आणि शिक्षण क्षेत्राला त्रास होऊ लागला. कादंबरीत भिनवाड्यातील शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या हिताची तळमळ आहे,पण स्वार्थासाठी राजकारणी आपलं अस्तित्व अबाधित राहावं म्हणून सत्याचा विपर्यास करतात. प्रत्येक चांगल्या कामात राजकारण आणि स्वार्थ आणला की भिनवाडा होतो म्हणजे वाटोळे होते असा कादंबरीतील आशय असल्याचे त्यांनी सांगितले 

 

भिनवाडा कादंबरी बद्दल बोलताना साहित्यिक सुनील शेडगे म्हणाले की ‘ही कादंबरी कोकण किंवा देश या प्रदेशातील नाही. माणदेशात दुष्काळ अनुभवलेल्या लेखकाने नोकरीच्या निमित्ताने दुर्लक्षित असलेल्या या प्रदेशातील जीवन तन्मयतेने चितारले आहे.प्रतापगड ते कोयनेच्या ७५ किमी परिसरात पसरलेल्या कांदाटी खोऱ्यातील संघर्षाची ही गाथा आहे. डोंगरदऱ्यांत जगणाऱ्या कष्टकरी माणसांचा जिव्हाळा आणि तिथल्या प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीचे वास्तव ‘भिनवाडा’ कादंबरीत उमटले आहे. मुलांसाठी झटणारा ‘विश्वास’ नावाचा शिक्षक आणि त्याच्या कार्यात अडथळा आणणाऱ्या प्रवृत्ती यांच्यातील हा लढा आहे. समस्या आणि दुर्गमता असूनही तिथल्या माणसांत असलेली आत्मीयता लेखकाने अनुभवातून मांडली आहे. लेखकाने खूप चिंतनातून साहित्य आणि वाचनाची साधना माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला कशी पैलू पाडते, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. विद्यार्थ्यांनी या कादंबरीतील जाणीवा घेऊन आपले व्यक्तिमत्व घडवले पाहिजे. माणसात माणसात असलेले वेगळेपण शोधत राहणे, हेच साहित्य अभ्यासात महत्वाचे ठरते, वेगवेगळे साहित्य वाचून विद्यार्थ्यांनी स्वतःला समृद्ध केले पाहिजे असेही ते म्हणाले. त्यांच्या रेडी ते रेवस प्रवासवर्णनाची माहिती त्यांनी दिली.

 अध्यक्षीय भाषणात प्रा.डॉ.सुभाष वाघमारे म्हणाले की ‘कोणत्याही विद्यापीठात आपल्या परिसरातील गुणवंत अशा स्थानिक लेखकांच्या कलाकृतीस स्थान दिले पाहिजे. विद्यार्थ्यांना वर्तमानकाळातील स्थानिक प्रश्न तसेच देश विदेशातील भोवताल साहित्यात येतो कसा ,त्यातून आलेल्या समस्या समजाव्यात, आणि स्वतःची व विचारपूर्वक प्रगती करावी असेअशी प्रेरणा मिळावी असे साहित्य अभ्यासक्रमात असले पाहिजे. बाळासाहेब कांबळे ,निलेश महिगावकर ,विठ्ठल गावस ,शरद बाविस्कर इत्यादी हे लेखक विचारी असून समाज चांगला व्हावा याची जाणीव घेऊन लिहिणारे लेखक आहेत असेही ते म्हणाले.

 या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा.प्रियांका कुंभार यांनी प्रास्ताविक केले. कुंदा कांबळे यांनी भिनवाडा कादंबरी सबंधित ‘अस्वस्थ जगण्याची कारसाय भिनवाडा’ समीक्षा ग्रंथ तयार होत असल्याचे सांगितले. पियुषा भोसले,अनुष्का साबळे या एम.ए ची विद्यार्थिनी माधवी जगदाळे ,लांजा येथील विद्यार्थी मिहीर पुरात यांनी प्रश्न विचारून वास्तव व कल्पना लेखन प्रक्रिया,आशय जाणून घेतला. सूत्रसंचालन त्रिशाली शिंदे हिने केले तर लेखक बाळासाहेब कांबळे यांनी विद्यार्थी व प्राध्यापक पेन भेट दिले.शेवटी डॉ.संजयकुमार सरगडे यांनी आभार मानले.या कार्यक्रमासाठी मराठी विभागातील डॉ.आबासाहेब उमाप ,डॉ.विद्या नावडकर , डॉ.संजयकुमार सरगडे ,प्रा .प्रियांका कुंभार ,प्रा. श्रीकांत भोकरे,प्रथमेश बाबर ,त्रिशाली शिंदे ,ऐश्वर्या भोसले,रोहित पवार, इत्यादींनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket