मंत्री मकरंद पाटील यांच्या मतदारसंघात रस्त्याचा बोजवारा; सुरूर–वाई–महाबळेश्वर मार्गावर जनतेचे हाल, जबाबदार कोण?
सुरूर–वाई–महाबळेश्वर रस्त्याचे रखडलेले काम; नागरिक व पर्यटक त्रस्त
सातारा: सातारा जिल्ह्यातील सुरूर–वाई–महाबळेश्वर या प्रमुख मार्गाचे रुंदीकरण व दुरुस्तीचे काम अनेक महिन्यांपासून रखडल्याने स्थानिक नागरिक, वाहनधारक आणि पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ठिकठिकाणी खोदकाम करून काम अपूर्ण ठेवण्यात आल्याने धुळीचे लोट, खोल खड्डे आणि अर्धवट डांबरीकरणामुळे प्रवास धोकादायक बनला आहे.
सुरूर ते महाबळेश्वर (पोलादपूर) दरम्यानच्या या मार्गावर काम कासवगतीने सुरू असल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. विशेषतः सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या वाढत असल्याने तासनतास वाहनांच्या रांगा लागतात. अनेक ठिकाणी अपघातांचा धोका निर्माण झाला असून वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
रस्त्याच्या कामामुळे उडणाऱ्या प्रचंड धुळीमुळे शेतकरी, भाजीपाला विक्रेते आणि स्थानिक व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. धुळीमुळे आरोग्याच्या तक्रारीही वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महाबळेश्वर हे राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळ असल्याने या रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे पर्यटनावरही विपरीत परिणाम होत असून पर्यटकांची संख्या घटल्याची चर्चा आहे.
या मार्गाचा समावेश मंत्री मकरंद पाटील यांच्या मतदारसंघात होत असल्याने नागरिकांकडून प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. “मंत्री या परिस्थितीबाबत अनभिज्ञ आहेत का?” असा सवाल वाई–महाबळेश्वर परिसरातील नागरिक करत असून, लवकरच आंदोलनाचा इशाराही देण्यात येत आहे.
दरम्यान, रखडलेल्या कामामुळे स्थानिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कामाला गती द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
सोशल मीडिया वरती वाई पाचगणी महाबळेश्वर रस्त्याबाबत जनतेचा प्रचंड उद्रेक दिसून येत आहे. याबाबत मंत्री मकरंदआबा पाटील कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष वेधून राहिले आहे.




